नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘इफेड्रिन’ पावडरच्या तस्करीप्रकरणी ठाण्यातील विशेष सत्र न्यायालयाने मंगळवारी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि ड्रगमाफिया विकी गोस्वामी या दोघांना फरार घोषित केले आहे.
‘इफेड्रिन’ पावडरच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचे रॅकेट ठाणे पोलिसांनी उघड केले होते. दोन हजार कोटी रुपयांच्या या रॅकेटमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णी, विकी गोस्वामीचा सहभाग असल्याचे समोर आले होते. या रॅकेटप्रकरणी गेल्या दीड वर्षांपासून ठाणे पोलीस कसून तपास करीत आहेत. अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी या दोघांविरोधात काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते. मंगळवारी या दोघांना न्यायाधीश एच.एम. पटवर्धन यांनी फरार घोषित केले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिशीर हिरे यांनी दिली.
अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी या दोघांना देशातील कोणत्याही ठिकाणाहून अटक करण्याची परवानगी न्यायालयाने ठाणे पोलिसांना दिली आहे. ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी या दोघांची देशातील मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले असल्याचे ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी सांगितले.