कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ मागील काही वर्षापासून वेश्या व्यवसायाचा अड्डा चालविणाऱ्या उल्हासनगरच्या तौफिक हिमायद सैय्यद उर्फ टोप्या (२६) याला महात्मा फुले पोलिसांच्या पथकाने रविवारी रात्री त्याच्या साथीदारांसह अटक केली. मागील काही महिन्यांपासून पोलीस टोप्या आणि त्याच्या साथीदारांच्या मागावर होते.

या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावरून पोलिसांनी वेश्या व्यवसायातील नऊ महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्यावरही अनैतिक व्यापार कायद्याने गुन्हे दाखल करण्यात आले. या महिला पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेशातील मूळ रहिवासी काही महिला या म्हारळ, कर्जत भिसेगाव, भायखळा, कोळसेवाडी, वडाळा, उल्हासनगर, शिळफाटा देसईगाव भागातील असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी तौफिक सैय्यद उर्फ टोप्या, त्याचे दोन साथीदार सुमैय्या अब्दुल रहेमान शेख (३०, रा. मलंग रस्ता, कल्याण पूर्व), रिहाना ख्वाजा शेख (२५, रा. अंबरनाथ) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. कल्याण पश्चिम नवीन एस. टी. बस आगाराजवळ तीन इसम रात्रीच्या वेळेत वेश्या व्यवसाय चालवित असल्याच्या वाढत्या तक्रारी नागरिकांकडून पोलिसांकडे येत होत्या. कल्याण रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी नवीन एस. टी. बस आगाराजवळील रिक्षा वाहनतळ आणि खासगी वाहनाने इच्छित स्थळी जातात. त्यांना या अड्ड्याचा त्रास सहन करावा लागत होता.

रेल्वे स्थानकाजवळील स्वच्छता गृहाच्या आडोशाने हे तीन इसम वेश्या व्यवसायाचा अड्डा चालवित असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. या रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या समोर हे गैरप्रकार उघडपणे सुरू होते. त्यामुळे परिसरातील व्यापारी, गृहसंकुलातील रहिवासी नाराजी व्यक्त करत होते.

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी शहरातील गांजा, मद्यपी, गर्दुल्ले, वेश्या व्यवसायाचे अड्डे मागील पाच महिन्याच्या कालावधीत मोडून काढले आहेत. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ वेश्या व्यवसायाचा अड्डा टोप्या नावाचा इसम आणि त्याचे दोन साथीदार चालवित असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. हा अड्डा बंद करण्याचे उपायुक्तांचे आदेश होते. रविवारी रात्री कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील नाल्याजवळील नवीन बस आगारा भागात पोलिसांनी सापळा लावला. या भागात टोप्या आणि त्याच्या साथीदारांनी नऊ पीडित महिलांना आणून त्यांना ग्राहकांबरोबर वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून ते पैसे घेत होते. हे पैसे ते स्वताच्या उपजीविकेसाठी वापरत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गरजु महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून हे तिन्ही जण अनैतिक व्यापार करत होते. रविवारी रात्री अकरा वाजल्यानंतर या भागात पीडित महिला आणि ग्राहकांची हालचाल सुरू होताच, सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या आदेशावरून वेश्या व्यवसायावर छापा टाकला. या अड्ड्यावरून नऊ पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले. अड्डा चालक टोप्या आणि त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली. हवालदार अजय पाटील यांनी पीडित नऊ महिला आणि अड्डा चालक यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.