लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : भिवंडी येथील खोणीगाव भागात धुळवड साजरी करण्यासाठी मोठ्या आवाजात गाणी वाजविल्याने एका तरूणावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोणीगाव येथील मांगतपाडा परिसरात जखमी राहुल गौतम हा त्याच्या मित्रांसोबत राहातो. तो परिसरातील एका यंत्रमाग कारखान्यात कामाला आहे. सोमवारी धुळवड असल्याने राहुल याने त्याच्या मित्रांसोबत धुळवड साजरी करण्यासाठी ध्वनीक्षेपक लावला होता. राहुल हा त्याच्या दोन मित्रांसोबत सोमवारी सांयकाळी धुळवड साजरी करत असताना या परिसरात राहणारा रामु गिरी हा त्याठिकाणी आला. त्याने ध्वनीक्षेपक बंद करण्यास सांगितले. त्यावर राहुल गौतम याने आमचा होळी सण असल्याने आम्ही नाचणार, गाणार असे त्याला सांगितले. त्यानंतर रामुने त्यांना शिवीगाळ केली आणि तो तेथून निघून गेला.

आणखी वाचा-ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार

अर्ध्या तासाने पुन्हा रामु त्याठिकाणी आला. त्याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. राहुल याने शिवीगाळ करू नको असे म्हटले असता, रामुने त्याठिकाणी असलेली कुऱ्हाड राहुलच्या पायावर मारली. पायातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने रामु तेथून निघून गेला. राहुलला त्याच्या मित्रांनी घरी नेले. त्यानंतर त्याने याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार रामु विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.