आपण सातवाहन कुळाच्या राजाचे वंशज आहोत. त्यामुळे दुर्गाडी किल्ला आणि बंदर पट्टीचा भाग आपल्या माळशेज नाणेघाट वनक्षेत्र पर्यटन विकास समितीच्या नावावर करण्यात यावा, अशी मागणी बनावट कागदपत्रांच्या आधारे कल्याण महसूल विभाग आणि बाजारपेठ पोलिसांकडे करणाऱ्या सुयश शिर्के-सातवाहन या तरूणाला बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी अटक केली.
तो नवी मुंबईतील सेक्टर नऊ, खांदा काॅलनी वसाहत भागात राहत होता. सुयशच्या मागणीने कल्याणमध्ये खळबळ आणि इतिहासाच्या अभ्यासकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मागील आठ वर्षाच्या काळातील दुर्गाडी किल्ला जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून या कागदपत्रांवर कल्याण तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरी, शिक्के मारले. ही कागदपत्रे खरी आहेत असे दाखवून सुयश याने कल्याण तहसीलदार कार्यालयात ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची जमीन आपण सातवाहन कुळाच्या वंशाचे असल्याने आपल्या माळशेज नाणेघाट वनक्षेत्र पर्यटन संस्थेच्या नावे करण्याची मागणी केली होती. असाच पत्रव्यवहार सुयशने दुर्गाडी क्षेत्र नियंत्रणाखाली असलेल्या बाजारपेठ पोलिसांकडे केली होती.
महसूल विभागाला सुयशच्या कागदपत्रांचा संशय आला. त्याची चौकशी करण्यात आली. त्यात ही कागदपत्रे संशयास्पद बनावट असल्याचे निष्पन्न झाले. बाजारपेठ पोलिसांनीही महसूल विभागाला या कागदपत्रांची सत्यता पडताळणीची मागणी केली होती. सुयशने दुर्गाडी किल्ल्याची जमीन स्वताच्या नावावर करण्यासाठी महसूल विभागाकडे दाखल केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे महसूल विभागाचे ठाम मत झाले.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशावरून तहसीलदार जयराज देशमुख यांनी कल्याणच्या मंडळ अधिकारी प्रीती घुडे यांना सुयश शिर्केवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. गेल्या आठवड्यात सुयशवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.
सुयशने दोन वेळा दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी पत्रकार परिषद घेण्याचा इरादा जाहीर केला होता. दोन्ही वेळा तो बेत त्याने रद्द केला होता. घटनास्थळी येताच पोलीस त्याला अटक करण्याच्या तयारीत होते. सुयशला गुरूवारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.