पतीने पत्नीच्या कार्यालयात घुसून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी भाईंदरमध्ये घडली. आरोपी कुमार भोईरने (३२) पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. पत्नी वीणाचे (३७) विवाहबाहय संबंध असल्याचा आपल्या मनात संशय होता. त्यातून आपण हे कृत्य केले असे कुमार भोईरने पोलिसांना सांगितले. या जोडप्यामध्ये सतत वादविवाद भांडणे व्हायची असे या जोडप्याला ओळखणाऱ्यांनी सांगितले.

वीणाने दोन जानेवारीला घर सोडले. त्यानंतर कुमार भोईरने ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर वीणा पोलिसांसमोर हजर झाली व आपणच स्वत: घराबाहेर पडल्याचे सांगितले. वीणा एक सीएच्या फर्ममध्ये कामाला होती. कुमार भोईर मंगळवारी तिथे गेला. कुमारला तिथे पाहून पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.

त्यावेळी रागाच्या भरात कुमार भोईरने भोसकून आपल्या पत्नीची हत्या केली. कुमार घटनास्थळावरुन पसार झाल्यानंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी कुमारने हत्या करण्यासाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे. कुमार भोईर मंगळवारी वीणाच्या कार्यालयाबाहेर तिची वाट पाहत थांबला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाईंदर स्टेशनजवळ सीएच्या फर्ममध्ये वीणा मागच्या आठवर्षांपासून नोकरी करते. सकाळी साडेदहाच्या सुमारास तिने कार्यालय उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी कुमार तिच्यामागोमाग कार्यालयात आला व घरी परतण्यासाठी तिला विनवणी करु लागला. वीणाने त्याची मागणी फेटाळून लावली. दोघांमध्ये वाद सुरु झाल्यानंतर संतापाच्या भराने त्याने वीणाच्या कानाखाली मारली त्यावेळी वीणाने त्याला तिथून निघून जायला सांगितले. त्यानंतर त्याने त्याच्याजवळच्या चाकू काढला व भोसकून वीणाची हत्या केली.