वसई : सरस्वती वैद्य हत्याकांड प्रकरणातील आरोपी मनोज साने याला ठाणे सत्र न्यायालयाने ६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सानेच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपल्यानंतर त्याला दुपारी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणातील पोलीस तपास पूर्ण झाला असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर सानेने नेमकी सरस्वतीची हत्या कशी केली ते स्पष्ट होणार आहे.
मीरा रोडला राहणाऱ्या मनोज साने याने त्याची कथित पत्नी सरस्वती वैद्यची ४ जून रोजी हत्या केली होती. तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवले होते. ८ जून रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर घटनास्थळावरूनच सानेला अटक करण्यात आली होती. साने एकूण १४ दिवस पोलिसांच्या कोठडीत होता. गुरुवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला ठाण्याच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.