शिवसेना, मनसे पदाधिकारी तसेच उत्तर भारतीयांचाही समावेश

मराठा आरक्षणासाठी बुधवारी ठाणे शहरात पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान दगडफेक, पोलिसांवर हल्ला आणि मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत ३६ आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये  शिवसेना नगरसेविका निर्मला कणसे यांचे पती शरद कणसे, शाखाप्रमुख अशोक कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी राजेश बागवे यांचाही समावेश आहे. अटक आरोपींमध्ये काही उत्तर भारतीय तरुणांचाही समावेश असल्याने ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आंदोलनात समाजकंटकांचा शिरकाव झाल्याच्या केलेल्या दाव्यास एकप्रकारे पुष्टी मिळाली आहे.

ठाणे न्यायालयाने या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. आंदोलनास हिंसक वळण देण्यात अग्रभागी असलेल्या आणखी २० जणांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळाले असून त्यांचाही शोध घेतला जात आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी ठाणे शहरात मराठा संघटनांकडून बंद पुकारण्यात आला होता. या बंददरम्यान मुंबई-नाशिक महामार्गावरील नितीन कंपनी चौकाजवळील उड्डाण पुलाच्या पायथ्याशी मराठा समाजाने ठिय्या आंदोलन केले होते. यामुळे चार तास महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. या सर्वाना महामार्गावरून हटविल्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या दगडफेकीत तीन पोलीस अधिकारी जखमी झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या.  २० जणांना अटक केली होती. त्यापैकी पाचजणांना नागरिकांनी पकडून दिले होते. या हिंसक आंदोलनाप्रकरणी नौपाडा आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्य़ात नौपाडा पोलिसांनी २३ तर वागळे इस्टेट पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली आहे. वागळेच्या गुन्ह्य़ातील आरोपींमध्ये उत्तर भारतीयांचा समावेश आहे तर नौपाडय़ाच्या गुन्ह्य़ात शिवसेनेचे शरद कणसे, शाखाप्रमुख अशोक कदम यांचा समावेश आहे. या सर्वाना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. हे  वर्तकनगर, पडवळनगर, रामचंद्रनगर, सावरकरनगर, वागळे इस्टेट, नवी मुंबई, भिवंडी आणि मानपाडा भागातील रहिवासी आहेत.

आरोपींची नावे..

दारा विक्रमादित्य चौहान, अंगद लालचंद चौहान, तेजस राजेश रेणुसे, सुनील शिवाजीराव पाटील, शिवाजी मारुती कदम, निखिल नंदकुमार जाधव, अक्षय अनिल आंबेरकर, दीपेश बंधू वनवे, राहुल अशोककुमार चौहान, रमण वासुदेव लाड, किरण पंढरीनाथ मोरे, विश्वास नथू चव्हाण, राजेश प्रताप बागवे अशी वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शरद शंकर कणसे, अशोक कदम, महेश अतकरे, दिनेश साठे, शुभम दरेकर, मंगेश बादल, अजय पाटील, वैभव पाटील, रोहित वीर, युवराज अवघडे, संदीप गावडे, हेमंत कुमावत, शिवाजी पाटील, संदेश पवार, शैलेंद्र उत्तेकर, संदीप कुटे, योगेश पवार, अनिकेत जाधव, विग्नेश भिलारे, निखिल वाईकर, प्रगती भोईर, गौरव देशमुख आणि १७ वर्षांचा मुलगा अशी नौपाडा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.