Marathi Actor Ketaki Chitale Bail: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अटक झालेल्या मराठी अभिनेत्री केतकी चितळेची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. ठाणे कोर्टाने बुधवारी केतकी चितळेला जामीन मंजूर केला होता. महिन्याभरापासून कारागृहात असलेल्या केतकीने बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली. यावेळी केतकीच्या चेहऱ्यावर हास्य होतं.

प्रसारमाध्यमांनी केतकी चितळेला प्रतिक्रिया विचारली असताना तिने जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मी बोलेन असं सांगितलं. तसंच मी कारागृहात एफवायबीएच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. मुलं चांगली असून त्यांना शिक्षकांची गरज असल्याचंही ती म्हणाली. यावेळी तिला प्रश्न विचारत प्रसारमाध्यमांनी बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण तिने जास्त बोलणं टाळलं.

Ketaki Chitale Bail: केतकी चितळेला जामीन मंजूर

१४ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे कळव्यात एफआयआर दाखल करुन घेतल्यानंतर केतकीला १५ मे रोजी अटक करण्यात आली होती.

नेमकं काय झालं होतं?

टीव्ही मालिकांमधील अभिनेत्री केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक खात्यावर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकुर प्रसारित केला होता. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एकने केतकीला नवी मुंबईतील कळंबोली येथून अटक केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर केतकीने या प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी वकिलांमार्फत ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. अखेर महिन्याभरानंतर ठाणे न्यायालयाने तिला याप्रकरणात जामीन मंजूर केला.