वेळमर्यादा वाढल्याने जिल्ह्य़ातील आस्थापनांना दिलासा

ठाणे : राज्य सरकारने करोना निर्बंध शिथिल करून दुकानांसाठीची वेळमर्यादाही वाढवल्याने अनेक व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. सरकारी निर्णयामुळे बाजारपेठांमध्ये गजबज निर्माण झाली असले तरी उपाहारगृहे पूर्णवेळ खुली ठेवण्यास मुभा दिली नसल्यामुळे या व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. र्निबधाच्या कात्रीत अडकलेल्या उपाहारगृह व्यावसायिकांनी गुरुवारी शहरात मूकमोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने निर्बंध काही प्रमाणात शिथिल करताच ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्य़ासाठी नवे आदेश जाहीर केले. यामध्ये त्यांनी मॉल बंदच ठेण्याचा निर्णय घेतला आहे. निर्बंध शिथिल होताना मॉल सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, अशी आशा मॉल व्यवस्थापनाला होती. यातूनच व्यवस्थापनाने मॉलमध्ये साफसफाई आणि र्निजतुकीकरणाचे कामही सुरू केले होते. परंतु जिल्हा प्रशासनाच्या आदेशामुळे त्यांच्या पदरी निराशा पडली. मॉल वगळता राज्य शासनाने जाहीर केलेल्या इतर सवलती जिल्हा प्रशासनाने जिल्ह्य़ांमध्ये जशाच्या तशा लागू केल्या असून काही आस्थापनांच्या वेळा वाढल्या आहेत. राज्य सरकारने व्यायामशाळा, योगवर्ग, केश कर्तनालये, स्पा आणि ब्युटीपार्लर या आस्थापना सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली होती. परंतु जिल्हा प्रशासनाने या सर्व आस्थापना सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली असून यामुळे या आस्थपनांना वाढीव वेळांचा दिलासा मिळाला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात उपाहारगृहे ५० टक्के क्षमेतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे, तसेच रविवारी रेस्टॉरंट आणि उपाहारगृहे बंद राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. शहरात दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली असताना उपाहारगृहांसाठी निर्बंध कायम ठेवले आहेत. यामुळे उपाहारगृह व्यावसायिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला असून उपाहारगृह संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. उपाहारगृहांची वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी ठाण्यातील उपाहारगृहांचे मालक मूकमोर्चा काढून महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांना निवेदन देणार आहेत.

व्यापाऱ्यांमध्ये समाधान

ठाणे शहरातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा आग्रह व्यापाऱ्यांनी धरला होता. या मागणीसाठी व्यापारी आंदोलनेही करीत होते. जिल्हा प्रशासनाने रात्री दहा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा दिल्याने व्यापाऱ्यांना आनंदाचे वातावरण पसरले आहे. मागणी केलेल्या वेळेपेक्षा अधिकचा वेळ मिळाल्याने व्यापारी खूश झाले असून व्यापारी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांचे आभारही मानले आहेत. शहरातील राम मारुती रोड, गोखले रोड, मुख्य बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. या ठिकाणी नेहमीपेक्षा थोडी जास्त गर्दी दिसून आली.

वाहनांची वर्दळ वाढली

राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हा प्रशासनाने सर्व शासकीय तसेच खाजगी कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारपासूनच लागू करण्यात आली आहे. परंतु आदेश सायंकाळी उशिरा आल्याने बुधवारपासून शहरात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे गेले काही दिवस घरातून काम करीत असलेला नोकरदार वर्ग कार्यालयात जाण्यासाठी सकाळी घराबाहेर पडला. यामुळे रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली होती. काही ठिकाणी कोंडी झाली. सार्वजनिक परिवहन सेवा १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असून यामुळे नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला.

उपाहारगृह व्यवसायिक नाराज

निर्बधांनुसार उपाहारगृहे सुरू असल्याने सद्य:स्थितीत दहा ते पंधरा टक्केच व्यवसाय होत आहे. उपाहारगृहाच्या जागेचे मासिक भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन, वीजदेयक तसेच विविध कर वेळेत भरावे लागत असून सध्या उत्पन्न मिळत नसल्यामुळे हा खर्च भागविणे शक्य होत नाही. उपाहारगृहात ग्राहक येण्याची वेळ ही सायंकाळी ७ वाजेच्या नंतरच असते, तरीही सायंकाळी चार वाजेपर्यंतच उपाहारगृह सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी खंत अंबरनाथ येथील स्टिक अँड बाऊल या उपाहारगृहाचे मालक अक्षय जाधव यांनी व्यक्त केली. नव्या आदेशात केवळ एकच दिवस वाढवून दिला असून त्याचा काहीच फायदा नाही. उपाहारगृहांना रात्री १० वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास मुभा देणे गरजेचे आहे, असे इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट्स असोसिएशन (आहार) संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले.