रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळूनही अद्याप कामाला सुरुवात नाही

ठाणे : ठाणे आणि भिवंडी शहरातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कशेळी ते अंजुरफाटा या भिवंडी ग्रामीण भागातील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे राडारोडा आणि काँक्रीटच्या साहय्याने बुजविण्यात आले होते. मात्र, हे खड्डे उखडल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून त्याचबरोबर सर्वत्र धुळधाण झाली आहे. धुळ प्रदुषण आणि खड्डे प्रवासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच खड्डयांमुळे वाहनांचा वेग मंदावून जागोजागी वाहतूक कोंडी होत आहेत. दहा मिनीटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असल्यामुळे नागरिकांना या मार्गावरील प्र‌वास नकोसा वाटू लागल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली: लोढा पलावामधील गुंतवणूक संस्थेकडून ३०० गुंतवणूकदारांची पाच कोटींची फसवणूक

ठाणे जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अनेक महामार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अशाचप्रकारे कशेळी-काल्हेर भागातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी या रस्त्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कामासाठी मागविलेल्या निविदांना अंतिम मान्यताही नुकतीच देण्यात आलेली आहे. कशेळी ते अंजूरफाटा दरम्यान ७.६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामे केली जाणार असून त्यापैकी ३.२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण, तर ४.५ किमी लांबीच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. याशिवाय, ७.४ किमी अंतरातील रस्त्यावर पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची सुधारणा केली जाणार आहे. तसेच मेट्रो मार्गाच्या मध्यभागी २०० वीजदिवे बसविले जाणार आहेत. असे असले तरी या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही.

हेही वाचा >>> “प्रत्येक ठिकाणी शक्तीप्रदर्शन….”, ठाण्यातील ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमावरुन ठाकरे गटाची CM शिंदेंवर टीका, म्हणाले “उगाच छाप मारायची”

कशेळी ते अंजुरफाटादरम्यान मोठ्या प्रमाणात विविध साहित्यांची गोदामे असून येथून अवजड वाहनांची मोठ्याप्रमाणात वाहतूक सुरू असते. या मार्गावर खड्डे पडल्यामुळे वाहनांचा वेग मदावल्याने कोंडी होत आहे. त्यातच वाहन बंद पडण्याचे प्रकार घडत असल्यामुळे कोंडीत भर पडत आहे. त्याचबरोबर अनेकजण कोंडी टाळण्यासाठी विरुद्ध दिशेच्या मार्गावरून प्रवास करीत असल्यामुळे कोंडी आणखी वाढत आहे. त्यात या रस्त्यावर ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेचे काम सुरू असल्यामुळे कोंडीत भर पडत आहे. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडत असून या रस्त्याची यंदा अक्षरश: चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी उंच-सखल रस्ता झाला आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे राडारोडा आणि काँक्रीटच्या साहय्याने बुजविण्यात आले होते. मात्र, हे खड्डे उखडल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. धुळ प्रदुषण आणि खड्डे प्रवासामुळे नागरिक हैराण झाले आहेत.