अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई
मीरा रोड रेल्वे स्थानक परिसर आणि शांतीनगर परिसरात पदपथांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर मीरा-भाईंदर महापालिकेने बुधवारी धडक कारवाई करीत पदपथ मोकळे केले. नागरिकांना चालण्यासाठी पदपथांची निर्मिती केली जाते, मात्र दुकानदारांनी त्यावर अतिक्रमण केल्याने नागरिकांना त्यावरून चालणे कठीण झाले होते.
शांतीनगर तसेच रेल्वे स्थानक परिसरात पदपथावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली होती. व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी बेकायदा पदपथांवर पत्र्याच्या शेड बांधून ते अडवले होते. त्यातच फेरीवाल्यांनीही भर रस्त्यात ठाण मांडल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनाही चालायला जागा शिल्लक नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. बेकायदा फेरीवाले आणि दुकानदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने महापालिकेकडे होऊ लागली होती. त्यातच फेरीवाल्यांवर कारवाई न झाल्यास स्थानिक नगरसेवक प्रशांत दळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आयुक्त अच्युत हांगे यांनी ६ एप्रिलला फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दळवी यांना दिले होते. या आश्वासनानुसार प्रशासनाने बुधवारी सायंकाळी कडक पोलीस बंदोबस्तात कारवाईची तयारी केली. परंतु या कारवाईची कुणकुण लागल्याने फेरीवाले आधीच बेपत्ता झाले होते. त्यामुळे प्रशासनाने दुकानदारांनी पदपथावर केलेल्या वाढीव बांधकामाकडे मोर्चा वळवला. जेसीबी यंत्राच्या साहाय्याने ही वाढीव बांधकामे उद्ध्वस्त करण्यात आली. आयुक्त अच्युत हांगे या वेळी स्वत: कारवाईसाठी हजर होते. याव्यतिरिक्त महापालिकेचे तीन उपायुक्त, शहर अभियंता, प्रभाग अधिकारी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांचा मोठा फौजफाटा या वेळी रस्त्यावर उतरला होता. मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेले शांती शॉपिंग सेंटर, भाजी बाजार तसेच शांतीनगर सेक्टर एक व दोन या ठिकाणी ही धडक कारवाई करण्यात आली. या वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणता अनुचित प्रकार घडला नाही. कारवाईमुळे पदपथ मोकळे झाल्याने रहिवाशांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

अनधिकृत टपऱ्या आणि फेरीवाले यांच्यामुळे पदपथ अडला जात होता म्हणून ही कारवाई केली. पदपथांवरील अतिक्रमणे व अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई यापुढेही सुरूच राहाणार असून मीरा रोडसह भाईंदरमध्येही अशी कारवाई करण्यात येणार आहे.
अच्युत हांगे, आयुक्त, मीरा-भाईंदर