उल्हासनगरः अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या घटक चार उल्हासनगरच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ३२ लाख ३० हजार रुपयांचा एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त केला आहे. गेल्या महिनाभरातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थ विक्रीच्या व्यवसायाची तीव्रता पुन्हा एकदा समोर आली आहे.

गेल्या काही वर्षात परिमंडळ चारमध्ये उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अमली पदार्थ विक्री, वाहतुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. उघड्या जागांवर अमली पदार्थाचे सेवन करतानाही अनेकांना ताब्यात घेतले जात असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी काटई अंबरनाथ मार्गावर नेवाळी नाक्याशेजारी एका महिलेला अमली पदार्थ विक्री प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. तिच्याकडून लाखो रूपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यानंतर नालासोपारा येथील एका व्यक्तीचा यात सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यालाही पोलिसांनी अटक करत मोठी साखळी उघड केली होती. त्यानंतरही अमली पदार्थ विक्रेत्यांचे विक्रीचे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे.

नुकतीच एका धाडीत लाखो रूपयांचा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या घटक चारमधील पोलिस हवालदार राजेंद्र थोरवे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पथकाने अंबरनाथ पूर्व येथील पालेगाव दर्गा परिसरात सापळा रचला. कारवाईदरम्यान फरहान हबीब चौधरी (२१) या मुंबईजवळील मानखुर्द येथील व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १६१ ग्रॅम एमडी अमली पदार्थ, मोबाईल फोन आणि रोकड असा एकूण ३२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणातील आणखी एक आरोपी अहमद कुरेशी (२२) याचा शोध पोलिस घेत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने केली. या धाडसी कारवाईमुळे परिसरातील अंमली पदार्थ रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. मात्र या अमली पदार्थ विक्री आणि वाहतुकीचे नेटवर्क उध्वस्त करून तरूणाईला या अमली पदार्थांच्या विळख्यातून सोडवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होते आहे.