अंबरनाथ: मुंबई आणि उपनगरांत घरे उभारण्यासाठी जागा मिळत नसल्याने म्हाडाने आता ठाण्याच्या पुढील शहरांकडे मोर्चा वळवला आहे. अंबरनाथमध्ये २०० एकर जमीन खरेदी करून त्यावर म्हाडाची सर्वात मोठी वसाहत उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता त्यांनी ही माहिती दिली. हा म्हाडाचा आजवरचा सर्वात मोठा गृहप्रकल्प असेल, असेही ते म्हणाले.
गेल्या काही वर्षांत ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागात मोठमोठय़ा गृहसंकुलांची उभारणी केली जात आहे. नवनव्या वाहतुकीच्या साधनांमुळे, नव्या रस्त्यांमुळे अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे, नवी मुंबई, मुंबई आणि इतर शहरांशी सहजरीत्या जोडली गेली आहेत. त्यामुळे या भागात अनेक नागरिक स्थलांतरित होत आहेत. परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी जागेच्या शोधात असलेल्या म्हाडानेही आतापर्यंत कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यांच्या वेशीवर खोणी, कल्याण तालुक्यात शिरढोण येथे दोन हजार घरे उभारली आहेत. त्यापाठोपाठ आता अंबरनाथमध्ये म्हाडा आजवरचा सर्वात मोठा गृहप्रकल्प उभारेल, अशी घोषणा आव्हाड यांनी केली.
‘अंबरनाथच्या चिखलोली परिसरात म्हाडाच्या वतीने सुमारे २०० एकर जागेचे सर्वेक्षण केले जाते आहे. ही जागा विकत घेण्याचे आम्ही निश्चित करत आहोत. येथे आतापर्यंतची म्हाडाची सर्वात मोठी वसाहत उभारण्याचा आमचा मानस आहे,’असे आव्हाड यांनी अंबरनाथमध्ये आले असता सांगितले. अंबरनाथ, बदलापूर शहरांचा इतर शहरांशी वाढलेला संपर्क, रस्ते यामुळे ही वसाहत फायद्याची ठरेल. मुंबई आणि इतर शहरांमध्ये आता जागा उरलेली नाही. आता तो भारही या शहरांना पेलवणार नाही. त्यामुळे उपनगरांमध्येच हे प्रकल्प होतील. जागेची उपलब्धता आता अंबरनाथ, बदलापूर याच भागांत आहे. त्यामुळे या भागात सर्वसामान्यांना परवडणारी घरे उभारण्याचा मानस आहे, असेही आव्हाड या वेळी म्हणाले. त्याचप्रमाणे प्रत्येक मंत्र्याला त्याच्या कारकीर्दीत भव्य असा प्रकल्प करण्याचे स्वप्न असते. त्यामुळे माझ्या कारकीर्दीतील हा मोठा प्रकल्प ठरेल, अशी आशाही या वेळी आव्हाड यांनी व्यक्त केली.
जपानच्या शासकीय कंपनीची मदत
या प्रकल्पासाठी जपानच्या शासकीय कंपनीशी बोलणी सुरू आहे. त्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी नुकतेच म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण केले आहे. या वेळी म्हाडाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.