scorecardresearch

ठाणे: घोडबंदर मार्गावर मेट्रो कामांसाठी मध्यरात्री वाहतूक बदल

घोडबंदर मार्गावरील कासारवडवली भागात मेट्रो मार्गिकेच्या खांबावर तुळई बसविण्यात येणार आहे.

traffic police
घोडबंदर मार्गावर मेट्रो कामांसाठी मध्यरात्री वाहतूक बदल(संग्रहित छायाचित्र)

घोडबंदर मार्गावरील कासारवडवली भागात मेट्रो मार्गिकेच्या खांबावर तुळई बसविण्यात येणार आहे. या कामामुळे गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना रविवारपर्यंत दररोज मध्यरात्री ठाणे पोलिसांनी प्रवेशबंदी केली आहे. येथील अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक कशेळी-काल्हेर आणि अंजूरफाटा या पर्यायी मार्गे वळविण्यात येणार असून या पर्यायी मार्गांवर कोंडी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>ठाणे: सासऱ्याच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय महिलेची आत्महत्या

घोडबंदर मार्गावरून जड-अवजड तसेच हलक्या वाहनांची वाहतूक मोठ्याप्रमाणात होत असते. या मार्गावर घाटकोपर ते गायमुख या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या मार्गिकेच्या कासारवडवली भागात मेट्रोच्या खांबावर तुळई बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रात्रीच्यावेळेत घोडबंदर मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरु असते. तुळई बसविण्याचे काम रात्रीच्या वेळेत करण्यात येत असून या कामामुळे मार्गावरील वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक मार्गात मोठे बदल लागू केले आहेत. रविवारपर्यंत मध्यरात्री ११.५५ ते पहाटे ५ यावेळेत ठाणे, भिवंडी येथून गुजराच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेशबंदी असेल.रविवारी गुजरातहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील कासारवडवली ते गायमुख या भागातही मेट्रो खांबावर तुळई उभारली जाणार आहे. त्यामुळे रविवारी घोडबंदरवरील दोन्ही मार्गिका मध्यरात्री अवजड वाहनांसाठी बंद असतील.

असे आहेत वाहतूक बदल

हेही वाचा >>>“मलाही सुमीत बाबाचा भक्त व्हायचंय”, जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला; म्हणाले, “बाबानी फोन केला की लगेच…!”

मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने माजिवडा पूल येथून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे किंवा कापूरबावडी जंक्शन येथून बाळकूम, कशेळी, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनाना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने गॅमन मार्गे खारेगाव खाडी पूलाखालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. नाशिक येथून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने मानकोली पूलाखालून अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. हलकी वाहने नागलाबंदर सेवा रस्ता येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करतील.

रविवारी गुजरातहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांनाही चिंचोटी नाका येथे प्रवेशबंदी असेल. तसेच मुंबई, वसई-विरार येथून येणाऱ्या वाहनांना फाऊंटन हाॅटेल येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने चिंचोटी नाका येथून कामण, अंजुरफाटा, माणकोली येथून इच्छितस्थळी जातील.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 15:56 IST

संबंधित बातम्या