गायमुख चौपाटीच्या कामात अडथळा ठरणाऱ्या जलवाहिनीचे स्थलांतर

ठाणेकरांना मनोरंजन आणि विरंगुळ्याचे नवे ठिकाण उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील खाडी किनारी भागात सुशोभीकरणाची कामे हाती घेतली आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

ठाणे महापालिकेवर साडेसात कोटींचा भार

ठाणे : घोडबंदर येथील गायमुख भागातील खाडी किनारी परिसरात ठाणे महापालिकेमार्फत विकसित करण्यात येत असलेल्या चौपाटी सुशोभीकरणाच्या कामात मीरा-भाईंदरच्या जलवाहिनीचा अडथळा निर्माण झाला आहे. ही जलवाहिनी हटवून रस्त्याच्या बाजूला स्थलांतरित करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव २० ऑक्टोबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. जलवाहिनी स्थलांतरित कामामुळे ठाणे महापालिकेवर सात कोटी ७८ लाख रुपयांचा भार पडणार आहे.

ठाणेकरांना मनोरंजन आणि विरंगुळ्याचे नवे ठिकाण उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील खाडी किनारी भागात सुशोभीकरणाची कामे हाती घेतली आहेत. कोपरी, बाळकुम, साकेत, कोलशेत, वाघबीळ आणि गायमुख भागांत ही कामे करण्यात येत आहेत. मात्र गायमुख चौपाटी सुशोभीकरणाच्या कामात मीरा-भाईंदरच्या जलवाहिनीचा अडथळा निर्माण झाला आहे.

मीरा-भाईंदर शहराला स्टेममार्फत पाणीपुरवठा होता. त्यासाठी घोडबंदर भागातून १३५० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीचा ८२५ मीटर लांबीचा भाग गायमुख चौपाटीच्या कामात बाधित होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्टेम प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत जलवाहिनी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी ठाणे महापालिका ५० टक्के तर स्टेमने ५० टक्के खर्च करण्याचा प्रस्ताव होता. महापालिकेच्या कामामुळे जलवाहिनी बाधित होत असल्याने त्यास स्टेमने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे ठाणे महापालिकेला आता स्वखर्चातूनच हे काम करावे लागणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने तयार आहे.

एकूण खर्च किती?

घोडबंदर येथील गायमुख भागातील जलवाहिनीच्या स्थलांतरित कामासाठी ५ कोटी १६ लाख ६२ हजार २५४ रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यावर १२ टक्क्याप्रमाणे ६१ लाख ९१ हजार ४७० रुपये वस्तू व सेवा कर लागणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जागेतून ही जलवाहिनी टाकावी लागणार आहे. त्यामुळे २०० कोटी रुपयांची रक्कम राज्य रस्ते विकास महामंडळाकडे जमा करावी लागणार आहे. जलवाहिनी स्थलांतरित कामासाठी असा एकूण ७ कोटी ७८ लाख ६१ हजार ७२५ रुपयांचा खर्च येणार असून त्याचा भार ठाणे महापालिकेवर पडणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Migration of waterway which is an obstacle in the work of gaimukh chowpatty akp

Next Story
सरस्वतीच्या साधनेने ‘लक्ष्मी’ प्रसन्न
ताज्या बातम्या