ग्रामीण भागातील दोन लाख नागरिकांची लसीकरणाकडे पाठ

पूर्वा साडविलकर

ठाणे : करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला येत्या रविवारी एक वर्ष पूर्ण होत असले तरी ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेचा अपेक्षित टप्पा गाठण्यासाठी आरोग्य विभागाची दमछाक होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आदिवासी, दुर्गम भागातील बहुतांश नागरिक लस न घेण्यावर ठाम असल्याने अशांचे समुपदेशन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्नांची शिकस्त केली जात आहे. दुर्गम तसेच आदिवासी, ग्रामीण पट्टय़ातील दोन लाख तर शहरी पट्टय़ातील पाच लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी लस घेतली नसल्याचे आढळून आले आहे. 

 करोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जात असताना लसीकरण हा एकमेव पर्याय असून नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान सुरू झालेल्या करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला येत्या रविवारी एक वर्ष पूर्ण होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील सुमारे सात लाख नागरिकांनी अद्याप लस घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काहींनी अन्यत्र लस घेतली असल्यास त्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लशीविषयी गैरसमज असल्यामुळे हे नागरिक लस घेण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे दिसून आले. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकही लसवंत व्हावे यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध माध्यमांचा वापर करून लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात येत होती. परंतु, अद्यापही ग्रामीण भागात आदिवासी, दुर्गम पाडय़ांतील बहुतांश नागरिकांनी लस घेतलेली नाही.

आरोग्य विभागासमोरील आव्हान

ठाणे ग्रामीण भागात १८ वर्षांपुढील नागरिकांची ११ लाख ३५ हजार १३२ इतकी संख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यापैकी दोन लाख ४२ हजार ५०५ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लशीची एकही मात्रा घेतलेली नाही.  ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात १८ वर्षांपुढील ६२ लाख ८ हजार ६५९ इतकी संख्या गृहीत धरण्यात आली आहे. यापैकी ५७ लाख ५१ हजार ३२५ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. ४ लाख ५७ हजार ३३४ नागरिकांनी अद्याप लशीची एकही मात्रा घेतलेली नाही. त्यामुळे लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण होत असले तरी, आरोग्य विभागासमोर या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान आहे.

ग्रामीण भागात आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांमध्ये  करोना होणार नाही असा समज निर्माण झाला आहे. त्यांच्या या शंकेच निरसन करून त्यांनाही लस घेण्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहेत. ही परिस्थिती केवळ ग्रामीण भागातच नाही तर, शहरी भागातही आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– डॉ. मनीष रेंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी