ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात राम गणेश गडकरी रंगायतन आणि डाॅ. काशीनाथ घाणेकर अशी दोन नाट्यगृह आहेत. शहरातील सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेली ही नाट्यगृह ठाणे शहराच्या मध्यवर्ती आणि पोखरण भागात आहेत. घोडबंदर भागात अशी सुविधा नसल्यामुळे त्यांना याठिकाणी यावे लागत आहे. नेमकी हिच बाब लक्षात घेऊन स्थानिक आमदार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोडबंदर भागात नाट्यगृह उभारणीचा प्रस्ताव ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिला असून त्यात नाट्यगृहासाठी जागाही सुचवली आहे.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. तर, नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागात डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे. शहराचा मानबिंदू असलेली ही दोन्ही नाट्यगृहे सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून परिचित आहेत. गडकरी रंगायतन नाट्यगृहाची आसन क्षमता १०५६ इतकी आहे. घाणेकर नाट्यगृहाची १०९५ तर, येथील लघु सभागृहाची क्षमता १८२ इतकी आहे. या नाट्यगृहांमध्ये शनिवारी आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी पाच हजारांच्या आसपास प्रेक्षक येतात. शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन आणि पोखरण रोड क्र. २ येथे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह आहे. परंतु घोडबंदर परिसरात राहणाऱ्या रहिवाश्यांसाठी त्यांच्या जवळच्या परिसरात एकही नाट्यगृह उपलब्ध नाही.

नाट्यगृह उभारणीची मागणी का ?

ठाणे शहरामध्ये होत असलेल्या अद्ययावत सोयी-सुविधांमुळे व ये-जा करण्याच्या सोयीमुळे मोठ्या प्रमाणात नाट्य तसेच सिने कलावंत देखील राहतात. परंतू, घोडबंदर परिसरात राहणाऱ्या रहिवाश्यांसाठी त्यांच्या जवळच्या परिसरात एकही नाट्यगृह उपलब्ध नाही. यामुळे या परिसरातील कलाप्रेमींना सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी शहराच्या दुसऱ्या टोकापर्यंत जावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. परिसरातील नागरिकांना, कलाकारांना आणि कला संस्थांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे याकरिता घोडबंदर परिसरात अद्ययावत असे नाट्यगृह व्हावे, अशी मागणी नाट्यप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे, असे सरनाईक यांनी म्हटले आहे.

येथे नाट्यगृह उभारा

स्थानिक नाट्यरसिकांच्या आणि नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने तसेच ठाणे शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडेल यासाठी घोडबंदर परिसरातील मौजे कावेसर येथील विकास प्रस्तावाअंतर्गत प्राप्त होणाऱ्या ७३४३.३२ चौ.मी. या सुविधा भुखंडावर एक अद्ययावत सुसज्य असे नाट्यगृह उभारण्याकरिता मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा तसेच पुढील कार्यवाहीसाठी संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.