महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र अश्वजित गायकवाड याने त्याच्या प्रेयसीला मारहाण करत तिच्या अंगावर गाडी घातल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घोडबंदर येथील कासारवडवली भागात काही दिवसांपूर्वी सदर घटना घडली होती. या घटनेनंतर राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “जर एखादा गुन्हा घडला असेल आणि आरोपी दोषी असेल तर तो सनदी अधिकाऱ्याचा मुलगा असो किंवा मोठ्या राजकीय नेत्याचा मुलगा असो, तो कायद्याच्या कचाट्यातून वाचणार नाही”, अशी प्रतिक्रिया एएनआय वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी दिली. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी अश्वजीत यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

प्रकरण काय आहे?

पीडित तरुणीचे अश्वजित गायकवाड यांच्यासोबत गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा दावा केला आहे. ११ डिसेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता अश्वजीत याला घोडबंदर येथील एका हॉटेलजवळ भेटण्यास गेली असताना तो त्याच्या पत्नीसह आढळून आल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. भांडणाचे पर्यवसन शिवीगाळ आणि हाणामारीत झाले.

हे पहा >> Photos : विवाहित असल्याचं बिंग फुटलं, सनदी अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीच्या अंगावर घातली गाडी

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना पीडित तरूणीने म्हटले, “आमचे साडे चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण अश्वजीत विवाहित आहे, याची मला पूर्वी कल्पना नव्हती. जेव्हा मला त्याच्या लग्नाबद्दल समजले, तेव्हा अश्वजीतने सांगितले की, तो पत्नीशी घटस्फोट घेणार असून माझ्याशी लग्न करू इच्छितो. त्यानंतरही आम्ही एकत्र राहत होतो. जेव्हा मी घोडबंदरला त्याला भेटायला गेली, तेव्हा तो त्याच्या पत्नीसह तिथे उपस्थित होता. त्यामुळे मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्याने रागात येऊन मला मारहाण केली.”

पीडितेने पुढे सांगितले की, मला खूप जबर मारहाण झाली आहे. चार दिवसांपूर्वी मी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. पण माझ्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. आज जेव्हा मी सोशल मीडियावर माझ्यावर झालेल्या अत्याचाराची वाच्यता केली. तेव्हा कुठे जाऊन पोलिसांनी माझ्या तक्रारीची दखल घेतली आहे.

दरम्यान परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पीडितेचा जबाब नोंदवून त्यांच्या सांगण्याप्रमाणे कासारवडवली पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान २७९, ३२३, ३३८, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा सविस्तर तपास सुरू आहे. तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे घटनास्थळाचे सीसीटिव्ही फुटेज, साक्षीदार आणि अन्य बाबींचा आम्ही सविस्तर तपास करीत आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित तरुणीच्या वकील दर्शना पवार यांनी सांगितले की, पीडितेला ज्या पद्धतीने जबर मारहाण झाली आहे, त्यानुसार आरोपींवर ३०७ चा गुन्हा दाखल करायला हवा. पण चार दिवसांपासून पोलिसांनी या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे आम्ही तपास अधिकाऱ्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर कलम अंतर्भूत करण्याची मागणी करत आहोत. जर हे कलम लावले गेले नाही, तर आम्हाला उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल.