ठाणे : राज्य शासनाने ठाण्यातील रस्त्यांसाठी ६५० कोटी दिले, पण अधिकारी आणि ठेकेदारांचे आर्थिक लागेबांधे असल्याने रस्ते खड्ड्यात गेले, असा गंभीर आरोप भाजपा आमदार संजय केळकर यांनी केला आहे. खड्ड्यांचा नाहक फटका करदात्या ठाणेकरांना बसत असल्याने आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा, यासाठी रस्ते नुतनीकरणाची कामे हाती घेण्यात आली. या कामांसाठी राज्य सरकारने ६०५ कोटी रुपयांचा निधी दिला. त्यापैकी काही कामे पूर्ण झाली तर काही कामे अर्धवट अवस्थेत आहेत. असे असतानाच पहिल्याच पावसात शहरातील महामार्ग, उड्डाणपूल आणि इतर भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले. १२ तासांच्या आत खड्डे बुजविण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी पालिका अधिकाऱ्यांसह सर्व प्राधिकरणांना दिले आहे. खड्ड्याच्या मुद्द्यावरून आता भाजपा आमदार संजय केळकर यांनी पालिका प्रशासनावर टीका केली आहे.

हेही वाचा – डोंबिवली: एटीएम सेवेतील कामगारांनी चोरली १३ लाखाची रक्कम

ठाण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अपघात, वाहतूक कोंडी अशा समस्यांनी सर्वसामान्य ठाणेकर गांजला आहे. या समस्यांना अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला. राज्य शासनाने ठाण्यातील रस्त्यांसाठी ६५० कोटी रुपये दिले. मात्र अनेक रस्ते कमी पावसातच खड्ड्यात गेले. दर्जाहीन कामे झाल्याने हा निधी वाया जात आहे. भर पावसात खडी सिमेंट टाकून खड्डे बुजवण्याचा लाजिरवाणा प्रकार ठाण्यात पाहायला मिळाला. आयुक्तांनी १२ तासांत खड्डे बुजवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले, मात्र अधिकारी आणि ठेकेदारांचे आर्थिक हितसंबंध असल्याने हे आदेश हवेत विरले. आयुक्तांचा आणि अधिकाऱ्यांचा ताळमेळ नसावा तर दुसरीकडे अधिकारी आणि ठेकेदारांची हातमिळवणी आहे, त्यामुळेच प्रामाणिकपणे कर भरूनही ठाणेकरांना खड्ड्यांशी सामना करावा लागत आहे, असा आरोप त्यांनी केला. अशा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे आणि संबंधित कंत्राटदारांना पुन्हा काम देण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

त्रासदायक वाहतूक बदल पूर्ववत करा

सध्या नागरिकांना विश्वासात न घेता वाहतुकीत बदल होत आहेत. काही ठिकाणी दुभाजकांनी वळण रस्ते बंद केले जात आहेत, तर कुठे मार्गच बदलले जात आहेत. यामुळे वाहन चालक आणि नागरिकांची ससेहोलपट होत आहे. या मुद्द्यावरूनही आमदार संजय केळकर यांनी पालिकेवर टीका केली आहे.

हेही वाचा – मेट्रो स्थानक बांधकाम क्षेत्र वगळून इतर मार्गरोधक हटवा, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतूक बदल हे नागरिकांना त्रासदायक नव्हे तर फायदेशीर असावेत, याबाबत मी या पूर्वीच वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना सुचित केले आहे. सध्या सुरू असलेले बदल निश्चितच नागरिकांना त्रासदायक असून विरोध होत आहे. त्यामुळे झालेले आणि होत असलेले बदल पूर्ववत करून नागरिकांना दिलासा देणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.