कल्याण : कल्याण शीळफाटा रस्त्यावरील कोंडीने प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. पर्यायी मार्ग नसल्याने प्रवासी शीळ रस्त्याचा मार्ग निवडत आहेत. हे सगळे कोणामुळे घडतय हे माहिती असुनही या रस्त्यावरून प्रवास करणारा बहुतांशी प्रवासी हा धर्म, भावनेचा आधार घेऊनच मतदान करत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत मनसेचे नेते राजू पाटील यांनी ‘प्रवाशांनो, शीळफाटा कोंडीचा त्रास होत असला तरी तुम्ही धर्म भावनेच्या आधारे मतदान करत चला,’ असा उपरोधिक, बोचरा सल्ला प्रवाशांना दिला आहे.
दूरदृष्टी, विकासाचा भविष्यवेध असणाऱ्या राजकीय मंडळी, नेत्यांना पुढे आणा. त्यांचा विचार करा. विकासाच्या बाजुने विचार करा, असा रोख राजू पाटील यांनी समाज माध्यमातील आपल्या उपरोधिक टीकेतून ठेवला आहे. कल्याण शीळ रस्त्यावर नेहमीची वाहतूक कोंडी असतेच. पण आता सणासुदीच्या काळात शीळ रस्ता पाच ते सहा तास वाहतूक कोंडीत अडकत असेल तर या मार्गाने जाणाऱ्या, या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी करायचे काय, असा राजू पाटील यांचा सवाल आहे. या रस्त्याने जाण्याचा योग येणारे चाॅपर करून भुर्रकन निघून जातात. त्यामुळे त्यांना या कोंडीची दाहकता कळत नाही, अशी टीका राजू पाटील यांनी केली आहे.
मागील तीन दिवस सलग सु्ट्ट्या, रक्षाबंधनाचा दिवस लोक हौस म्हणून बाहेर पडलेली. बहिणीकडे जाण्यासाठी निघालेली. अशा परिस्थितीत या हौसमौजेवर शीळ रस्त्याची कोंडी विरजण घालत असेल तर त्याचा आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. या रस्त्यावरील कोंडी विषयावरून सरकारविषयी लिहिताना आता आम्हालाच लाज वाटू लागली आहे. नागरिकांच्या वेळेची. जीवाची आणि जीवनाची काहींंना काहीही पडलेले नाही. त्यांची कामे त्यांनी ‘उरकून’ घेतली आहेत. आता रस्ते, पूल, खड्डे पुन्हा दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पुन्हा हात मारण्याची संधी यांना उपलब्ध झाली आहे. अशी टीका राजू पाटील यांनी काटई निळजे पुलाच्या दुरावस्थेवरून काही राजकीय नेत्यांवर केली आहे.
कल्याण शीळ रस्त्यावरून काही राजकीय नेते धावतात. पण त्यांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी वाहतूक नियंत्रक आहेत. सामान्य माणूस, प्रवाशांचे या कोंडीत हाल होत आहेत. त्याचा कोणी कधी विचार करतोय का, असा प्रश्न राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे. ज्यांनी या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे ते फक्त आपली गँग वाढविण्यात मग्न असल्याची टीका पाटील यांनी केली आहे.
महिला पोलीस वाद
सलग तीन दिवस शीळ रस्ता वाहतूक कोंडीने गजबजलेला होता. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या अनेक महिलांनी वाहनातून उतरून वाहतूक पोलिसांशी वाद घातले. तुम्ही या ठिकाणी असुनही वाहतूक कोंडी होतेच कसे. अगोदर कोंडी होऊन द्यायची, मोठी अवजड वाहने रस्त्यावरून सोडायची मग ती कोंडी सोडवत बसायचे हे उद्योग बंद करा, असे काही संतप्त महिला प्रवाशांनी शीळ रस्त्यावरील वाहतूक पोलिसांना सुनावले.