मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मंगळवारी (उद्या) ठाण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची जोरदार तयारी ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. सुमारे ४० हजारहून अधिकचा जनसमुदाय या सभेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता मनसेकडून वर्तविली जात आहे. तसेच मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या शाब्दीक वादानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरात ‘उत्तरसभा’ अशा आशयाचे फलक उभारले आहे. त्यामुळे राज ठाकरे सभेत काय बोलणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी मशींदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू झाल्या. त्यानंतर राज ठाकरे यांची अचानक ९ एप्रिलला ठाण्यात सभा आयोजित करण्यात आली. परंतु चैत्र नवरात्रौत्सव आणि गडकरी रंगायतन येथील एका कार्यक्रमामुळे पोलिसांनी ही परवानगी नाकारली होती. अखेर १२ एप्रिल म्हणजेच मंगळवारी डॉ. मूस मार्गावर ही सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे सभेची तयारी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झालेली आहे.

टीकेला राज ठाकरे देणार ‘करारा जवाब’; ठाण्यातल्या बहुचर्चित सभेचा टीझर मनसेकडून प्रदर्शित

राज ठाकरे यांचे २०० चारचाकी आणि एक हजार दुचाकीस्वारांच्या रॅलीत आगमन होणार आहे. ही रॅली ठाण्याच्या वेशीवरून थेट सभास्थानापर्यंत म्हणजेच डॉ. मूस मार्गापर्यंत असणार आहे. असे मनसेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या सभेस ३५ ते ४० हजारहून अधिकचा जनसमुदाय या सभेस उपस्थित असणार आहे. मुंबई तसेच पालघर जिल्ह्यातून येणार या बसगाड्या, मोठी वाहने साकेत आणि आनंदनगर टोलानाका येथे उभ्या केल्या जाणार आहे. मनसेचे ५०० ते ६०० स्वयंसेवक या सभेसाठी उपस्थित असतील. सभेचे व्यवस्थापन या स्वयंसेवकांकडे असणार आहे.