अंबरनाथ : शहरातील मनसेच्या नव्या शहराध्यक्षपदासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत रविवारी किंवा सोमवारी बैठक होणार असून, या बैठकीत अंबरनाथ मनसे शहराध्यक्ष पदाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी अंबरनाथ शहरातील मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या घडामोडीनंतर आक्रमक झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेवकांच्या कार्यालयाबाहेर नोटांचे बंडल दाखवून घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला होता.
या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर प्रथमच शुक्रवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव अंबरनाथमध्ये दाखल झाले. शिवाजीनगर येथील मनसेच्या कार्यालयात त्यांनी स्थानिक मनसैनिकांशी संवाद साधला. यावेळी पक्ष सोडून गेलेल्या माजी नगरसेवकांवर जाधव यांनी त्यांच्या खास शैलीत जोरदार टीका केली. तसेच, अंबरनाथ शहरात रविवारी किंवा सोमवारी नव्या शहराध्यक्षाची नेमणूक केली जाईल, असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले.
“पक्ष सोडून गेलेल्या माजी नगरसेवकांना आगामी महापालिका निवडणुकीत घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. जे गेले ते संघटनासाठी शून्य होते. त्यांना महाराष्ट्र सैनिक काय आहेत हे आगामी निवडणुकांमध्ये दाखवून देऊ,” असे यावेळी जाधव म्हणाले.
दरम्यान सोडून गेलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागातील त्यांनी काही विकास कामे केली असतील तर त्याबाबत अनियमितता, भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा कानमंत्र जाधव यांनी यावेळी दिला. बैठकीदरम्यान जाधव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “जे सोडून गेले त्यांनी शहरात कोणकोणती विकासकामे केली आहेत, त्याची सविस्तर माहिती मिळवा आणि त्या कामांमधील अनियमितता व भ्रष्टाचार बाहेर काढा.” त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्या माजी नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत.
ही बंडखोरी मनसे पक्षाच्या जिव्हारी लागली आहे. शहराची धुरा आणि संपूर्ण पक्षाची शहर पातळीवरची जबाबदारी या तीन महत्त्वाच्या माजी नगरसेवकांवर होती. त्यानंतरही ते पक्ष सोडून गेल्याने संताप व्यक्त होतो आहे. या बैठकीला अंबरनाथ, उल्हासनगर तसेच कल्याणमधील पदाधिकारीही उपस्थित होते.