ठाणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट आणि दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (mns) निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. ठाणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाचे शहराध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या पुढाकाराने “निवडणूक आयोगाची डोळ्याला पट्टी” या शीर्षकाखाली व्यंगचित्रात्मक फलक मोहिम राबवण्यात आली आहे.

नितीन चौक परिसरात लावण्यात आलेल्या या फलकावर एका व्यक्तीच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधलेली दाखवली असून त्या व्यक्तीला ‘निवडणूक आयोग’ असे संबोधण्यात आले आहे. त्या व्यक्तीने लक्ष्यफलकावर “बनावट मतदार” आणि “दुबार मतदार” असे शब्द लिहून त्यावर बाण मारलेले दिसतात. विशेष म्हणजे, त्या व्यक्तीच्या डोळ्यावर सत्ताधाऱ्यांची पट्टी बांधलेली दाखवून आयोग सत्ताधाऱ्यांच्या हितासाठी काम करत असल्याचा स्पष्ट संदेश या व्यंगचित्रातून दिला आहे.

या फलकाच्या माध्यमातून मनसेने निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेवर व उदासीनतेवर तीव्र प्रहार केला आहे. “दरवर्षी मतदार यादी अद्ययावत केली जाते, तरीसुद्धा हजारो मृत, दुबार, स्थलांतरित किंवा बनावट मतदारांची नावे कायम राहतात. या प्रकारामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे,” असे स्वप्नील महिंद्रकर यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, “आम्ही या व्यंगचित्र मोहिमेद्वारे आयोगाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधू इच्छितो.”

मनसेच्या या आंदोलनात्मक उपक्रमामुळे ठाण्यातील राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्येही या विषयावर चर्चा रंगू लागली असून, आगामी निवडणुकीच्या तोंडावर बनावट मतदारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनसेच्या या व्यंगचित्र मोहिमेमुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.