शुभारंभ उरकल्यानंतर दहा दिवसांनंतरही कामांना आरंभ नाहीच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवा परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंब्रा देवी कॉलनी रस्त्याचे दिवाळी पाडव्याचा मुहूर्त सलग तिसऱ्यांदा भूमिपूजन करण्यात आले. महापौर मीनाक्षी शिंदे, स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यानंतर तरी या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा दिवेकर बाळगून होते. प्रत्यक्षात मात्र शुभारंभ सोहळा उरकून दहा दिवस उलटले तरी रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.

दिवा शहरातील मुख्य रस्ता म्हणून मुंब्रा देवी कॉलनी मार्गाची ओळख आहे. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रहिवासी हैराण आहेत. या रस्त्याचे नूतनीकरण व्हावे यासाठी येथील रहिवाशांची मोठी मागणी आहे.   निवडणुकांचा मुहूर्त साधत या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सोहळा यापूर्वीही उरकण्यात आला आहे. तब्बल दोन वेळा असे सोहळे पार पडल्यानंतर दहा दिवसांपूर्वी दिवाळी पाडव्याचे औचित्य साधत महापौर, खासदार आणि उपमहापौरांच्या उपस्थितीत असाच सोहळा आयोजित करण्यात आला. पाडव्याचा मुहूर्त साधून दिवेकरांना दिवाळी भेट देत असल्याचे सांगून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यापूर्वी दोन वेळा असे कार्यक्रम उरकण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा हे काम लागलीच सुरू होणार का असा प्रश्न दिवेकरांना सतावत होता. त्यामुळे हे काम लवकरच सुरू होईल हे सांगण्यासही उपस्थित नेते विसरले नाही. मात्र, सोहळा उरकून दहा दिवस उलटले तरी हे काम सुरू झालेले नाही. दिवेकरांना नेहमीप्रमाणे हातावर तुरी देण्याचेच काम खासदारांनी केले आहे का असा सवाल दिव्यातील नागरिक वसंत गुरव यांनी लोकसत्ताशी बोलताना उपस्थित केला. हा रस्ता निव्वळ खडी रेतीचा असल्याने येथे अनेक अपघात  घडतात. त्यामुळे घाईघाईत भूमिपूजन करणे हे दिवेकरांसाठी नित्याचेच झाले असून रस्ता जेव्हा होईल तेव्हाच या भुमिपूजनावर विश्वास बसेल असेही ते म्हणाले.

महापालिका प्रशासनातर्फे रस्त्याच्या कामाची सुरुवात अद्याप करण्यात आलेली नाही. निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून कंत्राटदारासोबत करारनामा पूर्ण होताच हे काम केले जाणार आहे. या प्रक्रियेस दहा दिवस लागण्याची शक्यता आहे.

-संदीप माळवी, जनसंपर्क अधिकारी, ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbra devi colony road work not yet started even after 3rd bhumi pujan
First published on: 31-10-2017 at 04:35 IST