किशोर कोकणे, ठाणे

मुंब्य्रातील एका व्यापाऱ्याला जमीन दाखविण्याच्या बाहाण्याने उत्तर प्रदेशला बोलावून घेतले आणि तिथे तिघांनी त्याचे अपहरण करून त्याच्या कुटुंबीयांकडे एक कोटींची खंडणी मागितली. व्यापाऱ्याची सुटका करण्यासाठी पोलिसांनी एक योजना आखली. पण, आरोपी इतके हुशार होते की पैशांची बॅग घेतली आणि काही अंतरावर असलेल्या रेल्वे स्थानकावर व्यापाऱ्याला सोडून पसार झाले. व्यापाऱ्याची सुटका झाली खरी, पण आरोपींना पकडणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. पाच दिवस डांबून ठेवलेल्या खोलीत व्यापाऱ्याला मशिदीतील अजानचा आवाज यायचा, मशिदीची मिनार दिसायची आणि त्याचबरोबर दुकान, झाड, एक खांब दिसायचा. याच निशाण्यांच्या आधारे ठाणे पोलिसांनी या गुन्ह्य़ाचा छडा लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

मुंब्रा येथील कौसा भागात जमाल (बदललेले नाव) राहतात. व्यापारी असलेल्या जमाल यांच्या मोबाइलवर एक कॉल आला. आमची जमीन विकायची आहे आणि तुम्ही इच्छुक असाल तर जमीन पाहण्यासाठी या, असे मोबाइलवरून त्यांना समोरच्या व्यक्तीने सांगितले. त्यामुळे ही जमीन पाहण्यासाठी जमाल लखनऊ येथे गेले. त्यांची पत्नी जास्मीन (बदललेले नाव) या जमाल यांना मोबाइल करत होत्या. मात्र, मोबाइल बंदच येत होता. त्याचदरम्यान जास्मीन यांच्या मोबाइलवर एक कॉल आला. जमाल यांचे अपहरण केले असून त्यांच्या सुटकेसाठी एक कोटी रुपये द्या, असे समोरच्या व्यक्तीने त्यांना सांगितले. काही वेळानंतर त्याच व्यक्तीने पुन्हा मोबाइलवरून कॉल केला आणि जमाल यांच्याशी बोलणे करून दिले. लवकरात लवकर पैशांचा बंदोबस्त कर आणि यांच्या तावडीतून सुटका कर, असे जमाल हे जास्मीन यांना सांगत होते. हे ऐकून जास्मीन घाबरल्या आणि त्यांनी आरोपींनी दिलेल्या बँक खात्यांवर ८० हजार रुपये भरले. मात्र, संपूर्ण पैसे लवकर मिळाले नाहीत तर जमाल यांना जीवे मारू, असे अपहरणकर्त्यांनी जास्मीन यांना धमकाविले. यामुळे त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्य़ाचे गांर्भीय लक्षात घेऊन ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी या गुन्ह्य़ाचा समांतर तपास सुरू केला. नितीन ठाकरे यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागूल, पोलीस हवालदार आनंदा भिलारे, शिवाजी गायकवाड यांनी अपहरणकर्त्यांनी केलेल्या कॉलच्या आधारे तपास सुरू केला. त्यामध्ये हे क्रमांक नेपाळमधील असल्याचे समोर आले. पथकाने नेपाळ पोलिसांची मदत घेतली. पण, या क्रंमाकांची ठोस माहिती मिळत नव्हती. त्यामुळे तपासात काहीसे अडथळे निर्माण झाले होते. जमाल यांचा जीव धोक्यात असल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या सुटकेसाठी एक योजना आखली. आरोपींना पैसे घेण्यासाठी बोलवायचे आणि त्याच वेळी त्यांना पकडून जमाल यांची सुटका करायची, अशी ही योजना होती. ठरल्याप्रमाणे नितीन ठाकरे आणि त्यांचे पथक अपहरणकर्त्यांनी बोलवलेल्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पैशांची बॅग ठेवली. ही बॅग घेण्यासाठी कोण येते याकडे पोलीस नजर ठेवून होते. परंतु आरोपी इतके हुशार होते की, ते तिथे आले नाहीत. त्यांनी जास्मीनला कॉल करून वाहन घेऊन रक्सौल या रेल्वे स्थानकात जाण्यास सांगितले. तिथे जमाल असल्याचे सांगितले. त्यांनी जमाल यांची सुटका केली नव्हती. पैसे नेणाऱ्यांना पकडले तर जमाल यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याचा पोलिसांनी अंदाज घेतला. त्यानंतर जास्मीन यांनी पोलिसांसोबत रक्सौल रेल्वे स्थानक गाठले. त्या वेळेस तिथे जमाल हे त्यांना दिसले. जमाल यांची सुटका झाली खरी, पण आरोपींना पकडणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.

जमाल यांना गुंगीचे इंजेक्शन देण्यात आले होते. त्यांना अपहरणकर्त्यांबाबत काहीच सांगता येत नव्हते. मात्र, त्यांना आजूबाजूच्या काही खुणा आठवत होत्या. डांबून ठेवलेल्या ठिकाणी सहा घरांसाठी एक स्वच्छतागृह होते. या स्वच्छतागृहाजवळ जाताना एक किराणा दुकान होते. याच रस्त्यावर एक पपईचे झाड आणि खांब होता. खोलीत अनेकदा अजानचा आवाज यायचा. तेथून मशिदीचा मिनार दिसायचा. अशी माहिती जमाल यांनी पथकाला दिली. त्याआधारे पथकाने चंपारण्य येथील पोलीस अधीक्षक विजयकुमार आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिनेश यांची भेट घेऊन त्या परिसराचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी कंगळी येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने चार ते पाच मशिदीतील आजानचा आवाज जमाल यांना ऐकवला. मात्र, डांबून ठेवलेल्या खोलीत येणारा आवाज वेगळा होता. त्यामुळे अपहरणकर्त्यांचा शोध घेणे अजूनच कठीण झाले होते. अखेर अपहरणकर्त्यांनी ज्या भागात पैसे घेण्यासाठी बोलावले होते. तिथे असा परिसर आहे का, याचा शोध नितीन ठाकरे आणि त्यांच्या पथकाने घेतला. या तपासादरम्यान तिथे एक मिनार दिसला आणि तोच हा मिनार असल्याचे जमाल यांनी ओळखले. आजानचा आवाज सर्वकाही मिळतेजुळते होते. त्यामुळे अपहरणकर्ते याच भागात असल्याची शक्यता लक्षात घेऊन पथकाने शोधमोहीम सुरू केली. त्याच वेळेस सैफीउल्ली खान हा अपहरणकर्ता दुचाकीने जात असताना जमाल यांना दिसला आणि त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर त्याचे इतर दोन साथीदार मोहम्मद नूर आलम आणि इरफान खान या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. जमाल यांच्यासोबत असलेल्या वादातून हे कृत्य केल्याची कबुली तिघांनी दिली. सफीउल्ली याने गावातील ज्या नदीत मोबाइल फेकला होता. त्या नदीतून पथकाने मोबाइल शोधून काढला. हे तिघेही आता कारागृहात बंदिस्त आहेत.