अंबरनाथः शिलाहारकालीन ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये चांगल्या स्थितीत असलेले एकमेव शिवमंदिर अंबरनाथ शहरात आहे. या मंदिराची ओळख जपण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न होत असतानाच आता संपूर्ण अंबरनाथ शहराला मंदिराचे शहर म्हणून ओळख देण्यासाठी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. नुकतीच अंबरनाथ नगरपालिकेने एक निविदा जाहीर केली. त्याअन्वये पालिका आता मंदिराचे शहर ही संकल्पना राबवण्यासाठी या क्षेत्राती तज्ज्ञ प्रकल्प व्यवस्थापन आणि सल्लागाराची नेमणूक करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात वालधुनी नदीच्या किनारी ९६३ वर्षापूर्वीचे शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर आहे. भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारित येत असलेल्या या प्राचीन मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीनंतर निधी उपलब्ध झाला आहे. मात्र हे होत असताना आता शहराला मंदिराचे शहर म्हणून ओळख देण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने कंबर कसली आहे. आता शिवमंदिराच्या कलासंपन्न वास्तूकलेचा साजेसे शहरातील विविध चौक आणि रस्त्यांचे सुशोभिकरण केले जाणार आहे. त्यामुळे अंबरनाथ शहराला टेंपल सिटी अर्थास मंदिराचे शहर म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने नुकतीच निविदा जाहीर केली. शिवमंदिराच्या वास्तूशैलीला साजेसे चौक आणि रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी सल्लागार नेमले जाणारा आहेत. यात प्रकल्प व्यवस्थापन आणि त्यासाठीचा संपूर्ण आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. ही नेमणूक तीन वर्षांसाठी असणार आहे.

प्रतिक्रियाः अंबरनाथ शहर प्राचीन शिवमंदिरामुळे प्रसिद्ध आहे. मंदिराचे शहर या प्रकल्पामुळे अंबरनाथ शहराची जागतिक पातळीवर ओळख स्थापीत होण्यास मदत होणार आहे. – डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा. चौकटः एकेकाळी माचीस बनवण्याचा कारखाना आणि पुढे आयुध निर्माणीमुळे प्रसिद्ध असलेल्या अंबरनाथ शहराला अनेक बिरूदावली जोडली गेली. औद्योगिक शहर असलेले हे शहर मध्यंतरी राजकीय हत्याकांडाने चर्चेत आले. गुन्हेगारांचे शहर अशी ओळखही या शहराची झाली होती. शिवमंदिर आर्ट फेस्टिवलसह इतर उपक्रमांमुळे सांस्कृतिक शहर ही जुनी ओळख पुन्हा शहराला मिळाली. आता खेळाचे शहर ही ओळख मिळवण्यासाठी पालिकेने मोठी तयारी केली आहे. त्यात आता मंदिराचे शहर ही ओळख स्थापन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal administration started preparations to recognize the city of ambernath as a temple city zws
First published on: 04-01-2023 at 19:20 IST