पावसाळा तोंडावर आला, किंबहुना तो कधीही येईल असे वातावरण सध्या आहे. पावसाळ्यात शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिका प्रशासन कामाला लागले आहे. शहरात सर्वच ठिकाणी नालेसफाईची कामे सुरू आहेत. शहरातील या नाल्यांवर एक नजर टाकली असता सध्या होत असलेली कामे ही असमाधानकारक आहेत, असेच म्हणावे लागेल.
नेमेचि येतो पावसाळा याप्रमाणे जर महापालिकेने नालेसफाईची कामे नियमित सुरू ठेवली तर शहरात पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार घडणार नाहीत. मात्र पावसाळा जवळ आला की पालिकेच्या नालेसफाईला सुरुवात होते. आणि मग ती पावसाळ्यापूर्वी पूर्णच होत नसल्याचे चित्र दरवर्षी पाहायला मिळते. नालेसफाई नियमित करणे हे आवश्यक आहेत. परंतु जर नाले हे बंदिस्त केले तर नाले कचऱ्याने तुंबणारच नाहीत. दरवर्षी नालेसफाईसाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्याऱ्या पालिकेने शहरातील नाल्ये वरून झाकून टाकणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे घोडबंदर येथील आयुक्तांच्या घराशेजारील नाला वरून झाकून टाकला आहे. त्याप्रमाणे सर्वच नाल्यांवर झाकट टाकले तर त्या ठिकाणी नाल्यावर अतिक्रमणही होणार नाही व नाल्याशेजारी राहणारे नागरिक त्यात कचरा टाकणार नाहीत.
दरवर्षी नालेसफाई केली जाते. नालेसफाई नियमित जरी होत नसली तरी पावसाळ्याअगोदर तीन महिने नालेसफाईची कामे हाती घेणे आवश्यक आहे. मे महिन्यात पालिकेचे पदाधिकारी अधिकाऱ्यांसमवेत नाल्याची पाहणी करतात व मेअखेपर्यंत नाल्याची कामे पूर्ण करावीत असे आदेश देतात. मात्र प्रत्यक्षात १०० टक्के नालेसफाई होते का? हेसुद्धा पाहणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा अशा दुर्घटनेत जीवितहनी झाल्यास नालेसफाईचा मुद्दा हा ऐरणीवर येतो आणि याच मुद्दय़ावर पावसाळा संपला तरी सर्वसाधारण सभेत नगरसेवक चर्चा करत असतात. याप्रमाणे धोकादायक इमातरीचा प्रश्न ही एखादी बिल्डिंग कोसळल्यावरच सर्वाच्या निदर्शनास येतो. मात्र पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेचा अधिकारी किंवा पदाधिकारी या विषयावर चर्चा करीत नाहीत. मतदार, करदाते मात्र पालिकेच्या नावाने बोटे मोडताना दिसून येतात.
पावसाळा आणि नालेसफाई हे जरी समीरकरण असले तरी नाल्यामध्ये कचरा टाकू नका यावर पालिकेकडून जनजागृती होणे आवश्यक आहे व लोकांनीही त्याविषयी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. तसेच जर हे नाले बंदिस्त केले तर दरवर्षी नालेसफाईवर होणारा खर्च हा निश्चितच वाचेल व पर्यायाने ठाणेकरांनाही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी यावर एकत्रितपणे तोडगा काढण्याची गरज आहे. नुसतेच सर्वसाधारण सभेत चर्चा करून हा विषय सुटणार नाही तर यावर ठोस उपाययोजना कारणे आवश्यक असल्याचे मत ठाणेकरांकडून व्यक्त होत आहे.
प्राची

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal corporation preparation for rainy season
First published on: 23-05-2015 at 12:11 IST