महापालिका दक्ष!

महापालिका क्षेत्रात करोना संसर्गाची परिस्थिती आटोक्यात असली तरी करोनाच्या नव्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचा धोका लक्षात घेऊन महापालिका यंत्रणा दक्ष झाली आहे.

ओमायक्रॉन संसर्ग भीतीमुळे उपचारांसाठी व्यवस्था तयार ठेवण्याच्या हालचाली

ठाणे : महापालिका क्षेत्रात करोना संसर्गाची परिस्थिती आटोक्यात असली तरी करोनाच्या नव्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचा धोका लक्षात घेऊन महापालिका यंत्रणा दक्ष झाली आहे. या विषाणूच्या संसर्गाचा धोका अधिक असू शकतो हे लक्षात घेऊन त्यानुसार रुग्ण उपचारासाठी व्यवस्था तयार ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

रुग्ण संख्या कमी असल्यामुळे पालिकेने ग्लोबल व कौसा भागातील करोना रुग्णालये बंद केली आहेत. सद्यस्थितीत पार्किंग प्लाझा व भाईंदरपाडा भागातील पालिकेच्या रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ओमायक्रॉन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेनेही रुग्ण उपचारासाठी व्यवस्था तयार ठेवण्याची प्रक्रिया सुरू केल्या आहेत. करोना उपचारासाठी पालिकेने यापूर्वी ग्लोबल, कौसा क्रीडाप्रेक्षागृह, कळवा भूमिपुत्र, पोखरण रोड व्होल्टास कंपनी, भाईंदरपाडा या ठिकाणी तात्पुरती रुग्णालये उभारली आहेत. या सर्वच ठिकाणी चार हजाराहून अधिक खाटा उपलब्ध आहेत.  रुग्ण संख्येचा वाढता वेग लक्षात घेऊन उर्वरित रुग्णालयेही सुरू करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे.

ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमी  वर महापालिका क्षेत्रातील रुग्ण संख्या वाढीचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे रुग्ण उपचार व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत पार्किंग प्लाझा आणि  भाईंदर पाडा रुग्णालये सुरू आहेत. परंतु रुग्ण संख्या वाढली तर उर्वरित रुग्णालयेही टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नियोजन आखले आहे. प्राणवायू आणि औषधांच्या साठय़ाचेही नियोजन करण्यात आले आहे.

संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, ठामपा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Municipal efficient corona fear ysh