मालमत्ता विभागाचे अधीक्षक आहेर यांच्यावर राष्ट्रवादीचा आरोप

ठाणे : दिवा येथील एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील योजनेतील सदनिकांचा घोटाळा महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय शक्य नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु असतानाच स्थावर मालमत्ता विभागाचे अधीक्षक महेश आहेर हेच या घोटाळय़ाचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सोमवारी केला. आहेर यांना पदावरून तात्काळ निलंबत करून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. राजकीय दबावाला बळी पडून ठाणे पोलीस या प्रकरणी बघ्याची भूमिका घेणार असतील तर या प्रकरणी थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार करेन, असेही त्यांनी सांगितले.

दिवा येथील एमएमआरडीएच्या भाडेतत्त्व योजनेतील सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी इम्रान जुनेजा ऊर्फ मुन्ना र्मचड याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील प्रमुख सूत्रधाराचा शोध अद्याप पोलिसांना लावता आलेला नाही. तसेच हे प्रकरण काही दलालांशी संबंधित असल्याचे चित्र निर्माण जात असले तरी हा घोटाळा महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय शक्य नाही अशी चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरु आहे.  या पार्श्वभूमीवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना पत्र पाठवून त्यात या घोटाळय़ाची सखोल चौकशी आणि कारवाई करण्याची मागणी केली होती.

या घोटाळय़ातील आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालिका मुख्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाला महापालिका विरोधी पक्षनेते शानु पठाण यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महापालिकेचे स्थावर मालमत्ता विभागाचे अधीक्षक महेश आहेर यांच्याकडे घरवाटपाचे अधिकार आहेत. या प्रकरणातील फायली त्यांच्याकडे स्वाक्षरीसाठी येत असतात. त्यामुळे आहेर हेच या घोटाळय़ाचे प्रमुख सूत्रधार आहेत, असा गंभीर आरोप परांजपे यांनी यावेळी केला. यापूर्वी त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्राबाबत तक्रार केली होती. सर्व पुरावे देऊनही प्रशासनाकडून काहीच कारवाई झाली नव्हती, असा आरोपही त्यांनी केला.

 या घोटाळय़ाप्रकरणी आहेर यांच्यावर कारवाई करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे तयार नाहीत. त्यामुळे हा घोटाळा त्यांच्या आशीर्वादाने तर होत नाही ना, असा सवाल परांजपे यांनी उपस्थित केला. या घोटाळय़ातील छोटय़ा माशांना पकडून काहीच होणार नाही. त्यामुळे राजकीय दबाबाला बळी न पडता पोलिसांनी घोटाळय़ातील सूत्रधारावर कारवाई करावी. तसेच राजकीय दबावाला बळी पडून ठाणे पोलीस कारवाई करणार नसतील तर त्यांची तक्रार गृहमंत्र्यांकडे करेन, असेही त्यांनी सांगितले.

आहेर यांच्याकडून आरोपांचे खंडन

एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील योजनेतील सदनिकांमध्ये अनोळखी व्यक्ती राहत असल्याचे आढळून आल्यानंतर  मी डायघर पोलीस ठाण्यात स्वत: तक्रार दिली. याप्र करणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकूण १९ सदनिका ताब्यात घेऊन महापालिकेची मालमत्ता वाचविली आहे. दरम्यान, या घरवाटपात पैसे घेतल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यात आरोपींना अटक झाली आहे. त्यात पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी नाहीत. या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून सुरु असून चौकशीत जे काही असेल ते निष्पन्न होईल. या तपासाबाबत बोलणे उचित होणार नाही. परंतु माझ्यावर झालेले आरोप निराधार आहेत, असे स्थावर मालमत्ता विभागाचे अधीक्षक महेश आहेर यांनी स्पष्ट केले.