ठाणे : पश्चिम बंगालमध्ये सावत्र आईचा खून करून फरार झालेला सलीम मोल्ला (३२) हा आरोपी नऊ वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नुकतीच त्याला अटक केली आहे. त्याला पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यातील जांभळी नाका येथील गणेश मंदिर परिसरात खून करून फरार झालेला एक आरोपी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एकचे उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पथकाने सापळा रचून सलीम मोल्ला याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने २०११ मध्ये पश्चिम बंगालमध्ये राहत असताना सावत्र आईचा खून केल्याची कबुली दिली. आईचा खून केल्यानंतर  तो भिवंडीत वास्तव्यास आला होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याविरोधातील पुढील कारवाईसाठी पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder accused arrested after nine years zws
First published on: 11-11-2020 at 02:23 IST