ठाणे : दिवा येथील नागवाडी भागात घराजवळ थुंकतो म्हणून दशरथ काकडे (२८) याने शेजारी राहणाऱ्या रुपेश गोळे (१३) या मुलाची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दशरथ काकडे याला अटक केली आहे.
दिवा पश्चिम येथील नागवाडी भागात रुपेश विजय गोळे हा आईवडिलांसोबत राहत होता. त्याच्या शेजारी दशरथ हा राहत असून तो रुपेशचा नातेवाईकही आहे. दिवा येथे गावदेवीची जत्रा सुरू आहे. रविवारी दुपारी दशरथ हा रुपेशला जत्रेमध्ये फिरायला घेऊन गेला होता. सायंकाळी दशरथ घरी परतला. परंतु त्याच्यासोबत रुपेश आला नव्हता. त्यामुळे रुपेशच्या वडिलांनी दशरथकडे चौकशी केली असता तो जत्रेत खेळत असल्याचे सांगितले. त्यांनी जत्रेत जाऊन त्याचा शोध घेतला परंतु तिथेही त्याचा शोध लागला नाही. रात्री उशिरापर्यंत रुपेश घरी न आल्याने त्यांनी रुपेश बेपत्ता असल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून संशयित म्हणून दशरथ याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता रुपेश घराजवळ थुंकतो म्हणून त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुली दशरथने दिली.
स्वच्छतागृहात मृतदेह
दिवा येथील एका निर्जनस्थळी ठाणे महापालिकेचे एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहात कोणीही फिरकत नसते. त्यामुळे स्वच्छतागृहाच्या पहिल्या मजल्यावर दशरथ याने रुपेशला नेले. त्याठिकाणी त्याचा गळा दाबून खून केला. तसेच मृतदेह तिथेच सोडून दशरथ हा घरी आला होता. सोमवारी पोलिसांनी रुपेशचा मृतदेह स्वच्छतागृहातून बाहेर काढला.
संग्रहित लेख, दिनांक 21st Apr 2022 रोजी प्रकाशित
तरुणाकडून अल्पवयीन मुलाची हत्या; घराजवळ थुंकतो या क्षुल्लक कारणावरून कृत्य
दिवा येथील नागवाडी भागात घराजवळ थुंकतो म्हणून दशरथ काकडे (२८) याने शेजारी राहणाऱ्या रुपेश गोळे (१३) या मुलाची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-04-2022 at 00:30 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder minor youth spitting near home trivial reasons diva nagwadi amy