बालकवींपासून विंदा करंदीकर यांच्यापर्यत आणि केशवसुतांपासून कुसुमाग्रज यांच्यापर्यंत अभिजात कवींनी मराठी साहित्यात मोलाची भर टाकली..याच कवितांची भूरळ सध्याच्या तरुणाईला पडावी यासाठी संगीतकार कौशल इनामदार यांनी अभिजात मराठी कविताना संगीतबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
जुन्या-नव्या हिंदी गाण्यांचा अहोरात्र रतीब घालणाऱ्या खासगी एफएम वाहिन्यांनी ‘डाऊन मार्केट’ ठरवून मराठी गाण्यांवर टाकलेल्या अघोषित बहिष्काराविरोधात सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी केलेली अभिमान गीताची गांधीगिरी फारच प्रभावी ठरली. सुरेश भटांनी लिहिलेल्या ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ या अभिमान गीताने निर्माण झालेल्या दबावगटाने मराठी गीतांना एफएमची दारे खुली झालीच, शिवाय काही वाहिन्यांनी मराठी गाण्यांसाठी स्वतंत्र पारितोषिकेदेणेही सुरू केले. पाच वर्षांपूर्वी ठाणे शहरातून मराठी गीत-संगीताविषयी अस्मिता जागृत करणाऱ्या या चळवळीची सुरुवात झाली होती आणि आता त्याच्या पुढील अध्यायाचा श्रीगणेशाही याच शहरात होणार आहे. मराठी भाषेतील अजरामर काव्यरचनांची एक दृक्-श्राव्य फीत (व्हिडीओ अल्बम) सध्या कौशल इनामदार संगीतबद्ध करीत असून त्यात जगातील पाचही खंडांतील मराठी गायक, वादकांचा सहभाग असेल. मराठी कवितांच्या या दृक्-श्राव्य फितीमध्ये दिग्गज कलावंत सहभागी होणार आहेत.
जगातील उत्तम संगीत समूहांच्या साथीने मराठीतील अभिजात कविता नव्या स्वरूपात आणण्याचा प्रकल्प हाती घेतला असून त्यात केशवसुतांपासून आतापर्यंतच्या अनेक नामवंत कवींच्या रचना असतील. विंदा करंदीकर यांची ‘पर्वतांनो दूर व्हा रे’, बालकवींची ‘मोहिनी’ आणि केशवसुतांची ‘झपुर्झा’ आदी कविता या दृक्-श्राव्य चित्रफितीत असतील, अशी माहिती संगीतकार कौशल इनामदार यांनी दिली.
ठाण्यात रविवारी घोषणा
कौशल इनामदार, इंद्रधनु आणि मराठी अस्मिता परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी ११ वाजता गडकरी रंगायतन येथे ‘मराठी अभिमान गीत – एक आनंदयात्रा’ ही मैफल आयोजित करण्यात आली असून त्यात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. स्वत: कौशल इनामदार यांच्यासह राजश्री गोरे गीते सादर करणार आहेत. त्याचबरोबर सोनिया परचुरे, नकुल घाणेकर आणि शरयू कलामंदिरचे नर्तक सहभागी होतील. या कार्यक्रमास रसिकांना विनामूल्य प्रवेश असून प्रत्येकाला दोन प्रवेशिका दिल्या जाणार आहेत.