गाणे म्हणजे बुद्धी आणि भावनांचा मिलाफ. त्यामुळेच भावगीतांना सुगम संगीतात अतिशय महत्त्व आहे. शृंगार, हास्य, रौद्र, कारुण्य, बीभत्स, भयानक, वीर, अद्भुत आदी नवरसांनी आपले जीवन भरलेले असते. याच रसांतून मनातील भावनांचा ठाव घेणे सोपे जाते. अगदी त्याचप्रमाणे भावगीतांतून प्रत्येकाच्या मनातील भावनांचा आदर केला जातो. जेव्हा शब्द आणि सुरांची भट्टी जमते, तेव्हा शब्द जसे सुरांमध्ये गुंतले जातात, त्याचप्रमाणे रसिकही त्या सुरांच्या आरोह-अवरोहाच्या साथीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतात. अशाच प्रकारे प्रत्येक गाण्याला दाद देऊन ठाणेकर रसिकांनी बाबूजींच्या गाण्यांचा आस्वाद घेतला.
‘रंगाई’ संस्थेतर्फे बाबूजी नावाने ओळखले जाणारे मराठी मनाचे लाडके संगीतकार सुधीर फडके यांच्या रचनांवर आधारित भावगाण्यांची मैफल शनिवारी सायंकाळी गडकरी रंगायतनमध्ये सादर झाली. बाबूजींची जयंती आणि पुण्यतिथीचे औचित्य साधून हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे सुधीर फडके यांनी गायलेली गाणी त्यांचे संगीतकार-गायक पुत्र श्रीधर फडके यांनी सादर केली. त्यामुळे मैफलीत विलक्षण रंगत आली. कार्यक्रमाची सुरुवात ‘देव देव्हाऱ्यात नाही’ या गाण्याने झाली. या वेळी सुधीर फडके यांनी निर्मिती केलेल्या ‘वीर सावरकर’ या चित्रपटाच्या काही आठवणी जागविण्यात आल्या. ‘वीर सावरकर’ चित्रपटासाठी लागणारे पैसे बाबूजींनी रसिक जनतेमधूनच जमा केले होते. त्यामुळे जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्या वेळी आपल्या खिशातून तिकीट काढूनच त्यांनी हा चित्रपट पाहिला. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, तुम्हीच निर्मिती केलेला चित्रपट तिकीट विकत घेऊन का पाहता? तेव्हा त्यांनी नम्रपणे उत्तर दिले की, रसिकांचे पैसे घेऊन मी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे या चित्रपटातून आलेले पैसेही त्या रसिक मायबापाचे आहेत. त्यामुळे तिकीट काढून चित्रपट पाहणे हे माझे कर्तव्य आहे. तो किस्सा ऐकून सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘एकवार पंखावरूनि फिरो तुझा हात’ आदी गाणी सादर झाली. त्यानंतर ‘धुंदी कळ्यांना, तोच चंद्रमा, जाळीमंदी पिकली करवंदं’ आदी गाण्यांना रसिकांनी वन्स मोअरची दाद दिली. ‘जाळीमध्ये पिकली करवंदं’ या गाण्यावरील तुषार आंग्रे यांच्या ढोलकीला रसिकांनी मनमुराद दाद दिली. एकूणच मैफलीतील सर्वच गाण्यांना रसिकांनी टाळ्या आणि शिट्टय़ा वाजवून दाद दिली. बासरीवादक संदीप कुलकर्णी यांनी आपल्या बासरीच्या सुरावटीने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. व्यंकटेश कुलकर्णी यांच्या तालवाद्यांचा सुरेख मेळ जमला होता. बाहेर पाऊस पडत असताना ठाणेकर रसिक मात्र आतमध्ये स्वरांच्या पावसात चिंब भिजत होते. खूप दिवसांनी एखादा जुना जिवलग मित्र भेटावा, असे रसिकांचे झाले होते. २०१८ हे बाबूजींचे जन्मशताब्दी वर्ष आहे. तेव्हा काही विशेष कार्यक्रम करण्याची योजना आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करू, असे श्रीधर फडके यांनी या वेळी सांगितले. श्रीधर फडके यांनी त्यांचा मनोदय जाहीर करताच, रंगाई संस्थेचे संस्थापक दिगंबर प्रभू यांनी ‘आम्ही तुम्हाला मदत करू’ असे त्वरित सांगितले. या वेळी श्रीधर फडके यांच्याबरोबरच धनश्री देशपांडे, शिल्पा पुणतांबेकर यांनीही आपल्या गोड गळ्याने रसिकांची मने जिंकली. रात्रीचे पावणेबारा झाले तरी एकाही प्रेक्षकाने आपली खुर्ची न सोडता अजून गाणी घ्या असा आग्रह धरला. त्यामुळे ठाणेकर हे रसिकतेच्या बाबतीत नेहमीच पुढे असतात याचा पुन:श्च अनुभव येथे आला.