डोंबिवली – कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (कामा) अध्यक्षपदी उद्योजक नारायण माने यांची शनिवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सदस्यांकडून एकमताने निवड करण्यात आली. मागील वीस वर्ष कामा संघटनेचे सदस्य असलेले माने प्रथमच ‘कामा’ संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान होत आहेत.
नारायण माने हे डोंंबिवली एमआयडीसीतील इंडो अमाईन्स केमिकल कंपनीचे संस्थापक संचालक आहेत. दीपक विश्वनाथ यांची वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. विश्वनाथ हे टेक्नोकेम इंडस्ट्रिजचे संचालक आहेत. घरडा केमिकल्सचे प्रशांत घोरपडे यांची उपाध्यक्षपदी, ग्रासिम इंडस्ट्रिजचे कृष्णा यादव यांची सचिव पदी निवड करण्यात आली आहे. युनिलॅब कंपनीचे भास्कर सोनावळे यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली.
कल्याण अंबरनाथ परिसरातील उद्योजकांची सर्वात मोठी संघटना म्हणून कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स संस्था ओळखली जाते. ‘कामा’ संघटनेच्या डोंबिवली एमआयडीसीतील कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. इंडो अमाईन्स कंपनीत संचालक असलेले नारायण माने मागील वीस वर्षापासून कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स संस्थेचे सदस्य आहेत.
नवनिर्वाचित अध्यक्ष नारायण माने यांनी सांगितले, ‘कामा’ संघटनेच्या सदस्य असलेल्या सर्व आणि इतर कंपन्यांनी शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी आखून दिलेल्या चौकटीत कंपनीतील उत्पादन आणि इतर व्यवहार करावेत. कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये यावर आपला प्राधान्याने भर असणार आहे. तसेच, कल्याण, अंबरनाथ मधील उद्योजकांचे काही प्रश्न शासनस्तरावर यापूर्वी प्रलंबित आहेत ते मार्गी लावण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करू. तसेच, उद्योजकांच्या सूचना, काही नागरी समस्यांविषयक तक्रारी असतील त्या स्थानिक महापालिका, एमआयडीसीच्या माध्यमातून सोडविण्यासाठी पाठपुरावा करू. ‘कामा’ संघटनेच्या सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याला आपले प्राधान्य असेल, असे माने यांनी सांगितले.
डोंंबिवली एमआयडीसीत मिलापनगर भागात राहणाऱ्या अध्यक्ष नारायण माने यांचा शहरातील अनेक सामाजिक संस्था, पर्यावरण संस्थांमध्ये सक्रिय सहभाग आहे. सामाजिक उपक्रमातून ते दुर्बल घटक, गरजूंना साहाय्य करतात. वृक्षारोपणाचे उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार असतो. याशिवाय कार्यकारिणीतील इतर सदस्यांचा अनेक सामाजिक, निसर्ग संवर्धन उपक्रमात सक्रिय आहेत.
मागील वर्षभराच्या कालावधीत ‘कामा’चे माजी अध्यक्ष देवेन सोनी यांंनी उद्योजकांचे अनेक प्रश्न सोडविण्यावर भर दिला. पर्यावरण, प्रदूषणाचे निर्माण झालेले प्रश्न तातडीने मार्गी लावण्यावर भर दिला. कोणीही उद्योजकाने प्रदूषण करू नये. नागरिकांना त्रास होईल अशी कृती करू नये यावर यावर माजी अध्यक्ष सोनी यांचा विशेष भर होता. अध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल उद्योजक श्रीकांत जोशी, काटेकर, कमल कपूर अशा अनेक उद्योजकांनी कार्यकारिणीतील नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.