ठाणे – एकनाथ शिंदे हे दिल्लीत सर्वोच्च न्यायालयातील याचिकेसंदर्भात वरिष्ठ वकिलांशी चर्चा करण्यासाठी गेले होते. काल दिल्लीत देशाचे गृहमंत्री अमित शहा नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे दावा खासदार म्हस्के यांनी केला आहे. तसेच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा काल वाढदिवस होता. शिंदे दिल्लीत असल्याने त्यांनी राजनाथ सिंग यांची भेट घेतली असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.
मागील दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. अधिवेशनाच्या काळात उपमुख्यमंत्र्यांनी दिल्ली गाठल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामागे महायुतीमधील अंतर्गत कुरघोड्या कारणीभूत असल्याचा मोठा दावा केला होता. तर, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘गुरूपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शाह यांना भेटले! धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे धुवत आहेत असे दाखवले गेले होते. दिल्लीत गुरु अमित शाह यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले! त्यानंतर मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाली! तूर्त इतकेच! बाकीचा तपशील लवकरच!”, अशी पोस्ट एक्स अकाऊंटवर टाकल्याचे दिसून आले. मात्र, एकनाथ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयातील याचिकेसंदर्भात वरिष्ठ वकिलांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, देशाचे गृहमंत्री अमित शहा काल दिल्लीत नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
म्हस्केंची संजय राऊतांवर आगपाखड
एकनाथ शिंदे यांचे नाव घेतल्याशिवाय संजय राऊतांना घशाखाली अन्न जात नाही आणि सामनाचा पगार देखील मिळत नाही. राऊत आता भुंकत असून थोड्या दिवसांनी ते चावायला लागतील, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली. उबाठा पक्षाचं वाटोळं करणारे राऊत मिडियात चर्चेत राहण्यासाठी वेड्यासारखे बरळतात.
लवकरच ते फाटक्या कपड्यांमध्ये रस्त्यांवर फिरणार असून नाईलाजाने त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात दाखल करावं लागेल, असा टोला देखील त्यांनी लगावला. तसेच, राऊत जेव्हा दिल्लीत असतात आणि गटनेत्यांच्या बैठकीला जात नाहीत, तेव्हा ते सोनिया गांधी यांच्या घरची भांडी घासायला, राहुल गांधी यांच्या घरी झाडू मारायला गेले होते, असे म्हणायचे का या शब्दात टिका केली. तर, मातोश्रीचे पावित्र्य उबाठाने नष्ट केले त्यामुळे गुरुपौर्णिमेला बाळासाहेबांना वंदन करायला लोक मातोश्रीवर फिरकले नाहीत, असेही ते यावेळी म्हणाले. ऑगस्टमध्ये उबाठाला मोठे खिंडार पडेल, असे भाकित देखील त्यांनी केले.