मलप्रक्रियेचे पाणी उद्योगांना तर एमआयडीसीचे पाणी डोंबिवलीकरांना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई महापालिकेने ऐरोली आणि कोपरखैरणे या दोन उपनगरांमध्ये आखलेल्या मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पास राज्य सरकारने नुकत्याच तयार केलेल्या एका विशेष धोरणाच्या माध्यमातून पथदर्शी प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. या दोन महत्वकांक्षी योजनांमुळे कल्याण डोंबिवली शहराला तब्बल ५० दशलक्ष लिटर इतके अतिरीक्त पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबई महापालिकेतर्फे उभ्या केल्या जाणाऱ्या या मलप्रक्रिया केंद्रातून तयार होणाऱ्या शुद्ध पाण्याचा पुरवठा लगतच असलेल्या ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टयातील कारखान्यांना केला जावा आणि त्याबदल्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बचत होणारे पाणी कल्याण, डोंबिवली शहरांना पुरवावे असा स्पष्ट आदेश नगरविकास विभागाने काढला आहे. या पथदर्शी प्रकल्पासाठी नवी मुंबई महापालिकेस अमृत योजनेच्या माध्यमातून ७० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उपलब्ध करुन देण्याची तयारीही सरकारने दाखवली आहे.

राज्य सरकारने नागरी भागातील सांडपाणी प्रक्रिया पुनर्चक्रीकरण तसेच पुनर्वापराचे धोरण निश्चित केले असून त्यासंबंधीचा एक अध्यादेश नुकताच काढला आहे. त्यानुसार नवी मुंबई पालिकेच्या ऐरोली आणि कोपरखरणे येथील मलप्रक्रिया केंद्रांना पथदर्शी प्रकल्प दर्जा देण्यात येत आहे. या मलप्रक्रिया केंद्रांमध्ये पाण्यावर तृतीयस्तरीय प्रक्रिया करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे या पाण्याची गुणवत्ता चांगली असणार असून हे पाणी ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टय़ातील कारखान्यांना विकण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

औद्योगिक पट्टयाला औद्योगिक विकास महामंडळाकडून पाण्याचा पुरवठा होतो. प्रती लिटर २० रुपये दराने कंपन्यांना पाणी विकले जाते. नवी मुंबई पालिकेस १७ ते १८ रुपये दराने पाणी विक्रीची मुभा सरकारने दिली असून यामुळे एमआयडीसीचे तब्बल ५० दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची बचत होणार आहे. हे पाणी एमआयडीसीने कल्याण, डोंबिवली परिसराला वितरीत करावे, असे आदेश नगरविकास विभागाने काढले आहे. हा प्रकल्प कार्यान्वित होण्यास काही वर्षे लागणार असली तरी त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरांची भविष्याची पाण्याची गरज भागू शकणार आहे.

प्रक्रियेचा सुधारित स्तर

नवी मुंबई महापालिकेने यापूर्वी सीवूड परिसरात मलप्रक्रिया केंद्र उभारले असून या केंद्रातील पाण्याच्या विक्रीचे प्रयत्न मात्र अपयशी ठरले आहेत. याठिकाणी सांडपाण्यावर द्वितीय स्तरीय प्रक्रिया करण्यात येत होती. मात्र, कोपरखैरणे आणि ऐरोली येथील केंद्रात तृतीय स्तरीय प्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले असून यामुळे प्रक्रियायुक्त पाण्याची गुणवत्ता अधिक चांगली असेल, असा दावा नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर यांनी केला.

१६४ टीएमसी पाण्याचा घरगुती कारणांसाठी

२२ टीएमसी पाण्याचा औद्योगिक वापर

८० टक्के सांडपाणी घरगुती वापरातून

९७.५ टक्के सांडपाणी औद्योगिक वापरातून

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai dombivli to get additional water due to drainage processing project
First published on: 06-12-2017 at 02:24 IST