शनिवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी वसईतील बाजारपेठा सजल्या असून विविध पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी झालेली आहे, तसेच या साहित्याच्या किमतीमध्ये किरकोळ स्वरूपाची भाववाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवानंतर सर्वत्र नवरात्रोत्सवाचे वेध लागतात. नवदुर्गेच्या शृंगारासाठी वसईतील बाजारपेठही नववधूप्रमाणे सजली असून सणाचा जल्लोष दिमाखात साजरा करण्यासाठी तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नवरात्रात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या मुख्य देवतांची, तसेच त्यांची स्वरूपे असलेल्या नवदुर्गा, अपराजिता या कुलदेवींचीही पूजा केली जाते. मातीच्या घटांबरोबरच प्रतीकात्मक देवीच्या मूर्तीचीदेखील प्रतिष्ठापना करण्यात येते. या प्रतीकात्मक मूर्तीसाठी नाक, डोळे, नथ, गळ्यातील विविध हार विक्रीसाठी दाखल झाले आहेत. देवीच्या वेणी, कुंकू, कानातले अलंकार, मंगळसूत्र, मुखवटा, पैंजण, जोडवे, देवीचे मुकुट, घागरा, ओढणी, साडी, खण यांच्या खरेदीसाठी महिलांची वसईच्या बाजारपेठेत विशेष गर्दी दिसून येते, तसेच पूजा साहित्य आणि हवन सामग्रीचीही विक्री मोठय़ा प्रमाणात होत आहे. सुगंधित उदबत्ती, धूप, देवीसाठी ओटी, सुगडी, तीळाची फुले, कमळाची फुले, सप्तधान्य, चुनरी, देवीचे पूजा साहित्य, काचेच्या बांगडय़ा, देवीचा साज आदी साहित्याचा बाजारामध्ये मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे.

या बाजारपेठांमध्ये साहित्य

वसईतील आनंदनगर बाजारपेठ, झेंडाबाजार, विरार येथील रेल्वे स्थानकाजवळील बाजारपेठ, बोळींज येथील बाजार, सोपारा मार्केट या महत्त्वाच्या बाजारपेठ मानल्या जातात. यंदा नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून व्यापाऱ्यांनी ग्राहकांच्या पसंतीनुसार विविध साहित्य दुकानांमध्ये मांडले आहे. हे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

देवीच्या साडय़ा ५०० रु. पर्यंत

देवीसाठी लागणाऱ्या नऊवारी, सहावारी आणि पाचवारी अशा एकूण नऊ  प्रकारच्या रांगांमध्ये या साडय़ा २०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान उपलब्ध असल्याचे वसईतील लक्ष्मी नारायण अगरबत्ती स्टोर्सचे दीपक म्हात्रे यांनी सांगितले, तर नवरात्रोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्यांमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे ते म्हणाले. सध्या बाजारात अनेक डिझाइनदार गरबा उपलब्ध आहेत. नवरात्रोत्सवात या गरबामध्ये दिवा ठेवून देवीची पूजा केली जाते. या गरब्यांची किंमत २५० रुपयांपासून सुरू होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri markets
First published on: 30-09-2016 at 01:19 IST