बदलापूरः कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका येत्या पाच ते सहा महिन्यात होण्याची आशा आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसायला सुरूवात केली आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात काही पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे शहरात पक्षाची ताकद वाढते आहे. येत्या काळात ही ताकद आणखी वाढेल. पालिकेत किमान २० जागा पक्षाच्या निवडून येऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी केला आहे.

कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात महायुतीमध्ये शिवसेना, भाजपसह अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यासाठी कामही केले. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची ताकद दिसून आलेली नाही. शिवसेना यापूर्वीच्या पालिकेत सत्ताधारी पक्ष होता. त्यामुळे यंदाही शिवसेना पालिकेवर एकहाती सत्तेसाठी आग्रही आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर स्वबळाची भाषा सुरू केली आहे. शिवसेना आणि भाजपात विसंवाद वाढलेला आहे. अशात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाच्या रूपाने राज्यभरात काम करणाऱ्या आशिष दामले यांनी बदलापुरातही राजकीय सक्रीयता दाखवण्यास सुरूवात केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमाक काही पक्ष आणि संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आशिष दामलेही उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत असल्याचे वक्तव्य केले. सध्या पक्षाची ताकद वाढते आहे. आमच्या शहरात २० जागा येतील, असा विश्वास दामले यांनी व्यक्त केला. जशा जशा निवडणुका जवळ येतील तस चित्र आणखी स्पष्ट होत जाईल. सुरूवातीला विरोधक आम्हाला दोन जागा येतील अस म्हणत होते. आता दोनाचे चार आणि चाराचे आठ बोलायला लागले आहेत, अशी टीका दामले यांनी विरोधकांवर केली. मात्र पुढे बोलताना त्यांनी या आठचे सोळा आणि सोळाचे वीस करायला आम्हाला अजुनही तीन महिने आहेत, असे वक्तव्य केले. निश्चितपणे आम्ही पुढच्या काळात आमची ताकद आणखी वाढवू, असा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा

शहरात २० पेक्षा अधिक जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आहे. शहरात यापूर्वी ४७ प्रभाग अस्तित्वात होते. २५ शिवसेना, २० भाजप, दोन राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्षीय बलाबल होते. त्यानंतर सुमारे १० वर्ष बदलापुरात निवडणुका झालेल्या नाहीत. २० जागांवर राष्ट्रवादीचा दावा असल्याने महायुतीतील सर्वच पक्ष स्वतंत्रपणे तयारी करत असल्याची चर्चा होते आहे.