राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद परांजपे यांनी ट्विटरला एक व्हिडीओ ट्वीट केला होता. यानंतर शिंदे गटाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. माझ्यावरही खोटा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु असल्याचा गंभीर आरोप आव्हाडांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केलेले ट्वीट आणि दिलेल्या घोषणा याचे कारण देत अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रातोरात ते दखलपात्र करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आलेले आहेत,” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

“हे सरकार सरकारपेक्षा एखाद्या गँगस्टरसारखे वागत आहे. विरोधक विरोध करणार हे लोकशाहीत अभिप्रेत असतं. असे अटक करून आणि धमक्या देऊन काही होतं नसतं,” असंही आव्हाड म्हणाले आहेत. माझ्यावरही खोट्या गुन्ह्याची तयारी सुरु केली असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

यानंतर काही वेळाने केलेल्या ट्वीटमध्ये आठ पोलीस स्टेशनमध्ये आनंद परांजपे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे. “सरकारविरुद्ध बोलणं ही काय अतिरेकी कारवाई झाली की काय? ब्रिटीश विरोधकांचा आवाज बंद नाही करू शकले. तर अशा गुन्ह्यांनी लोकांचे आवाज कसे शांत करणार. विरोध तर होणारच आणि विरोध तर करणारच,” असा इशाराही आव्हाडांनी दिला आहे.

आनंद परांजपे यांच्याविरोधात मानहानी व राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सहकार्यालय प्रमुख सागर बापट आणि कृष्णा पडीलकर यांनी केली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp jitendra awhad tweets on case registered against anand paranjape in thane sgy
First published on: 23-12-2022 at 08:58 IST