राष्ट्रवादीच्या आरोपांना शिवसेनेकडून उत्तर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात आता आरोप-प्रत्यारोपाची लढाई सुरू झाली आहे. कळवा-मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत कचराभूमी, समूह विकास आणि मेट्रो प्रकल्पांना कोण आडवे आले त्याचे उत्तर द्यावे, अशा शब्दांत शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी बुधवारी आव्हाडांना आव्हान दिले.

कळवा-मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेने शहराचा विकास केला नसल्याचा आरोप केला होता. तसेच राष्ट्रवादीने दिलेल्या प्रस्तावांच्या आधारे शहरात सुरू असलेल्या चौपाटीसारख्या प्रकल्पांचे श्रेय शिवसेनेने घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला होता. पारसिक चौपाटी, शाई धरण आणि सेंट्रल पार्कच्या मुद्दय़ावरूनही शिवसेनेवर टीका केली होती. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के  यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आमदार आव्हाडांनी केलेल्या आरोपांचा खुलासा केला. त्या वेळी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर संजय मोरे उपस्थित होते. गेल्या २५ वर्षांत शिवसेनेने ठाण्याचा विकास केला म्हणून महापालिकेला २५ हून अधिक पुरस्कार मिळाले आणि तेही काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारनेच दिले आहेत, असेही म्हस्के यांनी सांगितले.

डायघर येथील कचरा प्रकल्पाचा पूर्ण आराखडा तयार होता आणि त्यात कोणतेही प्रदूषण होणार नव्हते. या प्रकल्पाला राष्ट्रवादीच्या कोणत्या मंत्र्याने त्या वेळी स्थगिती देण्याचे काम केले, याचेही उत्तर आव्हाडांनी द्यावे, असेही ते म्हणाले.

शाई धरण उभारणीसाठी स्थानिक नागरिकांचा विरोध असून त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठका घेतल्या आहेत. त्यावर लवकरच तोडगा निघेल. परंतु यापूर्वीच्या पालकमंत्र्यांनी आणि आव्हाडांनी त्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

२००९ पासून आव्हाडांनी पारसिक चौपाटीसाठी प्रयत्न केले असतील तर त्या वेळी सरकार कुणाचे होते आणि हा प्रकल्प आतापर्यंत पूर्ण का होऊ शकला नाही, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने हा प्रकल्प मार्गी लावत तेथील स्थानिकांचे पुनर्वसन करण्याची भूमिका घेतली, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. तसेच ठाणे शहराचा विकास झाला म्हणूनच नागरिक ठाण्याला पसंती देत असल्याचा दावा महापौर संजय मोरे यांनी केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp shiv sena issue
First published on: 26-01-2017 at 01:33 IST