scorecardresearch

ठाण्यात राष्ट्रवादीने जाळला चंद्रकांत पाटील यांचा पुतळा जाळला

राष्ट्रवादीच्या ओबीसी परिषदेमध्ये खासदार सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्राची फसवणूक झाली असल्याचे विधान केले होते.

ठाणे :  राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर टीका केल्यामुळे आक्रमक झालेल्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी गुरूवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुतळा जाळला.

राष्ट्रवादीच्या ओबीसी परिषदेमध्ये खासदार सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्राची फसवणूक झाली असल्याचे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. “खासदार आहात ना, समजत नसेल तर घरात बसा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा मसणात जा; पण, आरक्षण द्या” , अशी टीका पाटील यांनी केली होती. त्याविरोधात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी चंपाकली हाय हाय, चंद्रकांत पाटील मुर्दाबाद,  आरक्षणासह निवडणूक झाल्याच पाहिजेत,  अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.  

सर्वात जास्त वेळा संसदरत्न बहुमानाने सुप्रिया सुळे यांना सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, ज्यांना स्वतःच्या गावातील उमेदवारी वाचविता येत नाही. संन्यास घेण्याची घोषणा करून पराभवानंतरही तोंड वर करून काहीही बरळत आहेत, त्या चंद्रकांत पाटील यांना मनोविकारतज्ज्ञांकडे नेण्याची गरज आहे, अशी टीका करीत कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला कुंकू, नथीचे चित्र काढून त्यास जोडे मारले. त्यांनतर कार्यकर्त्यांनी त्याचा पुतळाही जाळला. हा महाराष्ट्र जिजाऊ, अहिल्यादेवी सावित्रीबाई फुले यांचा आहे. त्यांचा वारसा अतिशय सक्षमपणे सुप्रिया चालवित आहेत. याची जाण महाराष्ट्राला आहे. तरीही, चंद्रकांत पाटील यांनी त्यांना स्वयंपाक करण्याचा सल्ला देऊन देशातील तमाम मायभगिनींचा अवमान केला आहे. 21 व्या शतकात देशातील महिलांनी चूल मूल ही संकल्पनाच मोडीत काढून सर्वच क्षेत्रात  पुरूषांच्या बरोबरीने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. त्या महिलांना पुन्हा चूलमूल या संकल्पनेत अडकाविण्याची पाटील यांची मनुवादी विचारसरणी पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आली आहे, अशी टीका आनंद परांजपे यांनी यावेळी दिली. “शूद्र, पशू और नारी; सब है ताडण के अधिकारी”  अशी मानसिकता भाजपची आहे. त्याच मानसिकतेतून पाटील यांनी हे विधान केले आहे. यातून त्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले आहे, हे स्पष्ट झाले आहे. म्हणून त्यांना ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात पाठवा. त्यांच्यासाठी आम्ही एक बेड आरक्षित करीत आहोत. तसेच ते ठाण्यात आल्यावर त्यांना साडीची देऊ,  अशी टीकाही त्यांनी केली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp workers protest against bjp leader chandrakant patil for insulting remarks on supriya sule zws