कल्याण : उल्हास, काळू नद्या दुथडी भरून वाहत असल्याने टिटवाळा परिसर जलमय झाला. नागरी जीवन विस्कळीत झाले. अशा परिस्थितीत टिटवाळा जवळील फळेगावातील एका पुनर्वसन केंद्रातील महिलेचा वयोमानाप्रमाणे नैसर्गिक मृत्यू झाला होता. फळेगाव भागातील स्मशानभूमी पुराच्या पाण्याने वेढलेली. अशा परिस्थितीत या महिलेवर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी देवदत्तासारखी उभी राहिली कल्याण भागातील राष्ट्रीय आपत्ती बचाव पथकाची टीम (एनडीआरएफ).

राष्ट्रीय आपत्ती बचाव पथकाच्या (एनडीआरएफ) टीमने केलेल्या या कामाबद्दल सर्वस्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे. या पथकाने टिटवाळ्या जवळील पुराच्या पाण्याने वेढलेल्या फळेगाव भागात जाऊन पुनर्वसन केंद्रात नैसर्गिकरित्या मृत महिलेला ताब्यात घेऊन तिला खांदा दिला. महिलेचे पार्थिव ट्युबच्या बोटीवर ठेऊन हे पार्थिव पाच ते सहा फुटाची पाण्याची पातळी असलेल्या पाण्यातून व्हल्वत फळेगावच्या स्मशानभूमीत सुस्थितीत नेले. तेथे तिच्यावर आपल्या कुटुंबातील एक सदस्य गेली या भावनेतून केंद्र चालकांच्या उपस्थितीत त्या महिलेवर अंत्यसंस्कार केले.

फळेगाव मधील एका पुनर्वसन केंद्रातील महिलेचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. या महिलेचे अंत्यसंस्कार करण्यात येत असलेली स्मशानभूमी मंगळवार पासून पुराच्या पाण्याच्या वेढ्यात आहे. त्यामुळे पुनर्वसन केंद्रातील मृत महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करता येत नसल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना मिळाली. तहसीलदार शेजाळ यांनी तातडीने एनडीएआरएफच्या कल्याण पथकाला ही माहिती दिली.

तहसीलदार शेजाळ यांच्या सूचनेवरून एनडीआरएफचे पथक बुधवारी तात्काळ फळेगाव येथे पोहचले. त्यांनी पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. घरात महिलेच्या पार्थिवावर आवश्यक ते अंत्येष्टीचे विधी पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले. त्यानंतर पार्थिवाचा एनडीआरएफच्या पथकाने ताबा घेतला. महिलेचे पार्थिव एक चादरीत गुंडाळण्यात येऊन तिरडीवर ठेवण्यात आले.

फळेगावातील पुनर्वसन केंद्र ते स्मशानभूमी दरम्यानच्या रस्त्यावर पाणी साचले होते. या पाण्यातून स्मशानभूमीपर्यंत पार्थिव घेऊन जाणे ग्रामस्थ, पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांना शक्य नव्हते. एनडीआरएफने खांदा देऊन पार्थिव आपल्या जवळील टयुबच्या बोटीत ठेवले. बोटीतून पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आले. एनडीआरएफ पथकाच्या साहाय्याने स्मशानभूमीत पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एनडीआरएफने हे साहाय्य केले नसते तर पुराच्या वेढ्यामुळे अद्याप दोन दिवस पार्थिवावर अंत्यसंस्कार करणे शक्य झाले नसते, असे ग्रामस्थांनी सांगितले.

आतापर्यंत पाण्यात वाहून जाणाऱ्यांना जीवदान देणारे एनडीआरएफचे पथक, शेवटच्या प्रवासाला निघालेल्या माणसालाही तितक्याच आदर, प्रेमाने आधार देते, साहाय्य करते, अशा प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थ, केंद्र कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत होत्या.