डोंबिवली – गेल्या वर्षापासून डोंबिवली एमआयडीसीत ११० कोटी खर्च करून बांधलेल्या नवीन कोऱ्या सीमेंट काँक्रीट रस्त्यांची दररोज तोडफोड सुरू असल्याने रहिवासी, उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपासून एमआयडीसी फेज एकमधील श्री जी लाईफस्टाईल कंपनीसमोरील टाटा पाॅवर नाक्याकडून एमआयडीसीत येणारा काँक्रीटचा नवीन रस्ता फोडण्यात आला आहे.
मागील तीस वर्षाच्या कालावधीत एमआयडीसीत सुस्थितीत रस्ते झाले नव्हते. नागरिक, लोकप्रतिनिधींच्या सततच्या पाठपुराव्यामुळे एमआयडीसीतील रस्त्यांची कामे ११० कोटी रुपये खर्चुन करण्यात आली. यामध्ये एमआयडीची आणि पालिकेचा प्रत्येकी ५० टक्के निधी होता. अनेक वर्षानंतर प्रथमच डोंबिवली एमआयडीसीत काँक्रीटचे रस्ते झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत होते. ही रस्ते पूर्ण झाल्यानंतर विविध कारणे देऊन स्थानिकांना कोणतीही पूर्वकल्पना देता हे रस्ते विविध ठिकाणी फोडण्याची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी सेवा वाहिन्या, गटारे आणि इतर कामांसाठी रस्ते तोडण्यात येत आहेत.
काँक्रीटच्या नवीन कोऱ्या रस्त्यांची दररोज तोडफोड सुरू असल्याने या माध्यमातून करदात्या नागरिकांचा पैसा वाया घालविला जात आहे. करदात्यांच्या पैशातून ठेकेदाराला पैसे देिले जातात. मग ही कामे करून घेणाऱ्या नियंत्रक संस्थेला याची जाणीव नको का, असे प्रश्न स्थानिक रहिवासी, उद्योजक उपस्थित करत आहेत. श्री जी लाईफस्टाईल कंपनीसमोरील रस्त्याला एकही तडा गेला नव्हता. त्याला चिरा पडल्या नव्हत्या. तरीही हा रस्ता दोन दिवसाच्या कालावधीत तोडण्यात आला. याच रस्त्यासाठी शासनाने लाखभर रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे या रस्त्याची तोडफोड प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
एका वजनदार राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने या भागात काही ठेकेदार कार्यरत आहेत. त्यामुळे ते स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणांना जुमानत नसल्याची चर्चा आहे. अधिक माहितीसाठी एमआयडीसी अधिकारी, संबंधित प्रकल्प ठेकेदाराला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तो होऊ शकला नाही.