कोपरी पुलाचे काम लवकरच सुरू होणार
किशोर कोकणे
ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर असलेल्या जुन्या कोपरी रेल्वे उड्डाणपुलाचे काम येत्या चार ते पाच दिवसांत सुरू होणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी, तीन हात नाका, आनंदनगर भागात सकाळी आणि रात्रीच्या वेळेत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून नवे वर्ष ठाणेकरांसाठी कोंडीचे ठरण्याची चिन्हे आहेत.
कोपरी रेल्वे पूल वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद आहे. तसेच मुंबई आयआयटीनेही हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरविला होता. त्यामुळे या पुलाच्या रुंदीकरणाचे काम एमएमआरडीएने हाती घेतले होते. त्यासाठी २०१८ पासून मध्य रेल्वेकडून रेल्वेच्या हद्दीतील पुलाची काम केली जात आहेत. तर पोहोच रस्त्याचे काम मुंबई एमएमआरडीएकडून केले जात आहे. या पुलावर नव्या अतिरिक्त मार्गिका तयार करून त्यानंतर मुख्य पुलाचे काम करण्यात येणार होते. त्यानुसार जून महिन्यात अतिरिक्त मार्गिका तयार करण्यात आल्या. या मार्गिकेवर काही ठिकाणी तडे गेल्याने त्या वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या नव्हत्या. अखेर आयआयटीच्या परीक्षण अहवालानंतर या नव्या मार्गिकांवरून वाहतूक सुरू करण्यात आली होती.
वाहनांसाठी अतिरिक्त मार्गिका उपलब्ध झाल्याने जुन्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. या जुन्या मार्गिकांचे काम हाती घेण्यापूर्वी ठाणे वाहतूक शाखेने एमएमआरडीएकडे काही दुरुस्ती, तात्पुरते दुभाजक बसविणे आणि वाहतूक सेवकांची मागणी केली होती. एमएमआरडीएने इतर सर्व बाबी पूर्ण केल्या असल्या तरी त्यांना वाहतूक सेवक पुरविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे दोन महिने उलटूनही या मार्गिकांचे काम हाती घेण्यात आले नव्हते. अखेर एमएमआरडीएला १०० वाहतूक सेवक पुरविणे शक्य झाले आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत कोपरी रेल्वेचा जुना उड्डाणपूल दुरुस्तीचे काम हाती घेतले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पूल बंद झाल्याने होणारे परिणाम
कार, ट्रक, टेम्पो या वाहनांना नव्या पूल मार्गे, तर दुचाकी, रिक्षासारखी वाहने सेवा रस्ता, बारा बंगलामार्गे वळविली जाण्याची शक्यता आहे. मुंबईत जाणाऱ्या वाहनांचा भार सकाळी अधिक असते. त्यामुळे सकाळी तीन हात नाका, कोपरी भागात वाहतूक कोंडीची शक्यता वर्तविली जात आहे, तर रात्री मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांचा भार अधिक असतो. त्यामुळे रात्री आनंदनगर भागात वाहतूक कोंडी होऊ शकते.
