माजिवडा सेवाभावी जेष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने माजिवडा गावामध्ये नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात येणार असून ‘स्वच्छ माजिवडा-सुंदर माजिवडा’ या मध्यवर्ती संकल्पनेवर ही स्वागतयात्रा निघणार आहे. सकाळी ६.४५ वाजता श्रीचांगाईमाता मंदिरापासून सुरू होणारी ही स्वागतयात्रा गाव परिसरात फिरणार असून रांगोळीच्या सुशोभिकरणाने स्वागतयात्रेचे स्वागत केले जाणार आहे.
माजिवडा परिसरात एक्य-स्नेह-बंधूभाव वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने माजिवडा सेवाभावी जेष्ठ नागरिक संस्थेने पुढाकार घेऊन गावकऱ्यांच्या सहकार्याने नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर छत्रे यांनी ही माहिती दिली. गावातील नागरिकांना पारंपारिक वेषात कुटुंबीयांसह या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या माजिवडा सेवाभावी संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात येत असून गेली महिन्याभरापासून या यात्रेची तयारी सुरू आहे. या स्वागतयात्रेस प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार मकरंद मुळे उपस्थित राहणार आहेत.