एखाद्या परिसरातील छोटय़ा-मोठय़ा समस्यांची जाण तेथे राहणाऱ्या नागरिकांनाच अधिक असते. त्यांनाच या समस्येला सातत्याने तोंड द्यावे लागत असते. त्यामुळेच सजग वाचकांनी आपल्या विभागातील समस्यांबाबत आम्हाला कळवावे, असे आवाहन ‘लोकसत्ता ठाणे’च्या वतीने करण्यात आले. याला ‘वाचक वार्ताहरां’नी चांगला प्रतिसाद दिला. तुमच्या परिसरातील समस्यांना तुमच्याच लेखणीतून वाचा फोडणारे हे नवे सदर आजपासून..
मुलगी लहान असताना तिच्या नावाने ठरावीक रक्कम पोस्टात गुंतवत गेले, की वयाच्या २१व्या वर्षी त्या मुलीच्या नावे चांगली रक्कम उपलब्ध करून देणारी महत्त्वाकांक्षी ‘सुकन्या ठेव’ योजना केंद्र सरकारने आणली आहे. या योजनेचा सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या उच्च शिक्षण वा विवाहासाठी मोठा फायदाही होऊ शकतो. मात्र चांगल्या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसेल आणि त्याबाबत सरकारी कर्मचारीच उदासीन असतील, तर काय होते, याचे प्रत्यंतर उल्हासनगरमधील पोस्ट कार्यालयात गेले की पाहायला मिळते.
‘व्हॉट्स अॅप’वरील संदेशांतून ‘सुकन्या ठेव’ योजनेबद्दल माहिती मिळाली. या योजनेची माहिती घेण्यासाठी मी व माझी पत्नी उल्हासनगर ३ मधील पोस्ट कार्यालयात गेलो. तेथील कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता, त्यांनी दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे बोट दाखवले. त्या कर्मचाऱ्याकडे चौकशी केली असता त्याने कार्यालयात लावलेले माहितीपत्रक वाचण्यास सांगितले. अत्यंत काळपट अशा झेरॉक्सची प्रत असलेले ते माहितीपत्रक कसेबसे वाचूनही काही प्रश्न मनात होते. म्हणून पुन्हा त्या कर्मचाऱ्याकडे गेलो असता, पुन्हा त्यांनी ‘तुम्ही शेजारी विचारा’ असे सांगून मान फिरवली. शेजारच्या स्त्री कर्मचाऱ्याकडून समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर पोस्टाच्या वेगवेगळ्या योजना आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजदराचा बोर्ड हात करून दाखवला.
ही सगळी उठाठेव करताना लक्षात आले, की ही ‘सुकन्या ठेव’ नावाची योजना पंतप्रधानांनी मोठा गाजावाजा करून सुरू केली असली, तरी पोस्टातील कर्मचाऱ्यांनाच याविषयी धड माहिती नाही. अशीच योजना एखाद्या खासगी कंपनीने अथवा बँकेने आणली असती, तर ती घरोघरी पोहोचवण्यासाठी त्यांनी आपले कर्मचारी कामाला लावले असते. पण ‘सरकारी काम आणि फक्त थांब, थांब, थांब..’ असं म्हणतात, तेच खरे!
अक्षय क्षीरसागर, उल्हासनगर
पारसिक पार्क केव्हा होणार?
विवेक तवटे, कळवामुंब्य्राजवळील रेतीबंदरच्या पारसिक टेकडीवर राखून ठेवण्यात आलेल्या पार्कच्या जागेचा बहुधा ठाणे महापालिकेलाच विसर पडलेला दिसतो. गेल्या कित्येक महिन्यांपासून या ठिकाणी ‘पारसिक पार्क’चे प्रवेशद्वार उभारण्यात आले असले, तरी आतमध्ये मात्र भकास रान वाढत चालले आहे. पार्कसाठी राखीव असलेल्या या जागेवर अतिक्रमण होण्याची भीती असून झोपडपट्टय़ासुद्धा उभ्या राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेंगाळलेला हा प्रकल्प लवकर मार्गी लावण्याची गरज आहे. या भागामध्ये चांगल्या सुखसोयी देणाऱ्या पार्कची निर्मिती झाल्यास या भागातील नागरिकांना त्याचा चांगला लाभ होऊ शकले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष घालून हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.
जांभळी नाक्याजवळच्या रस्त्यांची दुरवस्थाऋचा
सासवडे, ठाणेठाण्याच्या मध्यवर्ती असलेल्या तलावपाळी परिसरातून पुढे चालत गेल्यानंतर जांभळी नाका आणि त्याच्या बाजूलाच ठाण्याची बाजारपेठ सुरू होते. ठाणे शहरातील रस्त्यांची चांगली सुधारणा केली जात असताना, या भागातील रस्त्यांची मात्र पुरती दुरवस्था झाली आहे.
या भागातील रस्त्यांवर खड्डय़ांचे आणि घाणीचे साम्राज्य असून अनेक वर्षे या रस्त्यांची सुधारणाच केली गेली नाही. प्रामुख्याने मोहम्मद अली रोड, जांभळी नाका मार्केट ते जवाहरलाल मार्ग लेनपर्यंतच्या रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. साहजिकच याचा त्रास वाहनचालक आणि पादचाऱ्यांना होतो आहे.
‘वाचक वार्ताहर’साठी वृत्त पाठवण्याचा पत्ता : लोकसत्ता ठाणे कार्यालय, कुसुमांजली, दुसरा मजला, कॉसमॉस बँकेच्या वर,
गोखले रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम) ४००६०२, ई-मेल: newsthane@gmail.com, फॅक्स : २५४५२९४२.