फेसबुकवर महिलेशी मैत्री करून तिची आर्थिक फसवणूक करणाऱ्या नायजेरियन व्यक्तीस नवघर पोलिसांनी अटक केली आहे. पीटर ओक्वुचुक्वु असे त्याचे नाव असून तो नायजेरियातील अनाम्ब्रा राज्यातील उत्तर प्रांतात राहणारा आहे. त्याला पोलिसांनी नवी मुंबईतून अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेची स्वत:चे ग्रे बेन्सन असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीशी फेसबुकवर जून महिन्यात ओळख झाली होती. बेन्सन याने आपण लंडन येथे राहत असून अभियंता असल्याचे महिलेला सांगितले. दोघांनी एकमेकांचे मोबाइल क्रमांक दिल्यानंतर ते कायम संपर्कात होते. त्यानंतर बेन्सनने महिलेशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करून तिला एक किमती भेटवस्तू पाठवणार असल्याचे सांगितले.

काही दिवसांनी महिलेला तिच्यासाठी एक पार्सल आले असल्याचा फोन आला. मात्र ते घेण्याआधी पैसे भरावे लागणार असल्याचे तिला सांगण्यात आले.

या महिलेने १ लाख ८३ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांत जमा केले. परंतु त्यानंतरही तिच्याकडे पैशांची मागणी करण्यात येऊ लागली. संशय आल्याने महिलेने नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे यांच्या पथकाने आरोपीला नवी मुंबईतून अटक केली, त्याचे सहकारी मात्र फरार झाले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nigerian person who was deceiving the woman was arrested
First published on: 21-09-2018 at 02:32 IST