कल्याण – रुग्णवाहिके अभावी कल्याणमधील पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात एका महिलेचा दोन महिन्यापूर्वी मृत्यू झाला. या मृत्युप्रकरणी आयुक्तांनी रुक्मिणीबाई रुग्णालयातील डाॅक्टरांसह एकूण सहा कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले. एवढा दणका बसुनही रुक्मिणीबाई रुग्णालय प्रशासन सुधारण्याची चिन्हे नाहीत. गेल्या बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पालिकेचे दोन वरिष्ठ अधिकारी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल झाले. यावेळी रुग्णालय कामकाजात अनेक त्रृटी आढळून आल्याने प्रशासनाने रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. शोभना लावणकर यांना शिस्तभंग कारवाईची नोटीस बजावली आहे.

या नोटिसीप्रमाणे ४८ तासात खुलासा करण्याचे डाॅ. लावणकर यांना सूचित करण्यात आले आहे. वैद्यकीय आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी ही नोटीस बजावली आहे. पालिका आरोग्य विभागाचा कारभार अतिशय ढिसाळ असल्याचे निदर्शनास आल्यापासून आयुक्त अभिनव गोयल यांनी या विभागावर करडी नजर ठेवली आहे. आरोग्य विभागाच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी आयुक्तांनी पालिका मुख्यालयात अनेक वर्ष ठाण मांडून असलेल्या, रुग्ण सेवेऐवजी पालिका मुख्यालयात भित्तीपत्रके, जनजागृती पत्रके छापणे, निविदा, नुतनीकरणाची प्रकरणे हाताळण्यात रस असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आयुक्तांनी केल्या. पालिका आस्थापनेवरील आणि बाह्य स्त्रोत विभागाचे रुक्मिणीबाई रुग्णालयातील सहा कर्मचारी निलंबित केले.

आयुक्त गोयल यांनी मिळालेल्या माहितीवरून बुधवारी (ता.११) मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या दरम्यान अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, वैद्यकीय आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांना रुक्मिणीबाई रुग्णालयासह इतर दोन रुग्णालयांना भेटी देण्याचे सूचित केले. हे दोन्ही अधिकारी साध्या वेशात रुक्मिणीबाई रुग्णालयात अचानक दाखल झाले.

या दोन्ही अधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या प्रत्येक रुग्ण कक्षात जाऊन पाहणी केली. त्यांना रात्रपाळीतील कर्तव्यावरील सर्व कर्मचारी हे बाह्य स्त्रोत विभागातील असल्याचे समजले. यामध्ये एकही पालिकेच्या आस्थापनेवरील कायमस्वरुपी कर्मचारी नव्हता. रुग्णालयात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तरी बाह्यस्त्रोत कर्मचारी तात्काळ निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे अडचणी येण्याची शक्यता असते हे माहिती असुनही रात्रपाळीत सर्व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर ठेवल्याने अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला.

अपघात विभागात कर्तव्य असलेले वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. ही गंभीर बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. रुग्णालयात महिला रुग्ण, कर्मचारी असतात. हे पाहता रुग्णालयातील विकी तेजा हा कर्मचारी अर्ध विजारीवर रुग्णालयात रात्रपाळीत उपस्थित होता. कार्यालयीन शिस्तीचा विचार करता हा गंभीर विषय असल्याचे मत अधिकाऱ्यांनी नोंदवले.

रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या नियंत्रक प्रमुख म्हणून आपले रुग्णालय प्रशासनावर पर्यवेक्षण आणि नियंत्रण नसल्याचे मत दोन्ही पालिका अधिकाऱ्यांनी नोंदवले. मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कर्तव्य करण्यात आपण कसूर करत आहात. त्यामुळे आपल्या विरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही का करू नये, अशी नोटीस डाॅ. शोभना लावणकर यांना प्रशासनाने बजावली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डाॅ. लावणकर यांना अपघात विभागातील नियुक्त वैद्यकीय अधिकारी आणि विकी तेजा यांना नोटिस बजावण्यास सांगण्यात आले आहे. आपले कर्तव्य योग्यरितीने पार न पाडल्याने डाॅ. लावणकर यांंनी सर्वसंंबंधितांना नोटिसा काढल्या आहेत.