‘स्पाइसी’ म्हटलं की आपल्याला झणझणीत, मसालेदार पदार्थाच्या चवीची आठवण होते. ही चव डोळय़ात पाणी आणणारी, जिभेला झणका बसवणारी. पण तरीही असे पदार्थ आपल्याला खुणावत असतात. ठाण्यातील ‘ओ स्पाइसी’मध्ये अशा पदार्थाची लज्जत चाखायला मिळतेच; पण एरवी कमी तिखट समजले जाणारे पदार्थही येथे तिखट अवतार धारण करतात..
‘अतिपरिचयात अवज्ञा’ असे खाण्याच्या बाबतीत अनेकदा होते. घरचे खाणे कधीही चांगलेच, पण कधीतरी रुचीपालट करावासा वाटतो. अशा वेळी शहरातील एखादा चमचमीत खाद्यपदार्थ मिळणाऱ्या ठिकाणाकडे पावले वळतात. ठाण्यातील ‘ओ स्पाइसी’ हे त्यातलेच एक. वास्तवातील जगण्यापेक्षा थोडी लार्जर लाइफ पाहण्यासाठी जसे आपण चित्रपटांकडे वळतो, तसेच जिव्हेचेही असते. ती कधीतरी नेहमीपेक्षा अधिक तिखट आणि मसालेदार खाण्यासाठी आसुसलेली असते. आपली ही इच्छा ‘ओ-स्पाइसी’मध्ये सुफळ संपूर्ण होते.
इथे आपल्याला पावभाजी, तवा पुलाव, सँडविच, पिझ्झा, डोसा, उत्तप्पा आणि बरोबर ज्यूस ,ब्लॉसम असे २९५ पदार्थ आणि पेयांची चव चाखायला मिळते. पावभाजी तर रस्त्यावरच्या गाडीपासून ते थेट हॉटेलमध्ये सगळीकडे उपलब्ध असते. या प्रत्येक ठिकाणच्या पावभाजीची चव वेगवेगळी असते. ‘ओ स्पाइसी’मध्ये आपल्याला जैन पावभाजी, खडा पावभाजी, मसाला पावभाजी अशा ४ ते ५ प्रकारच्या पावभाज्यांची चव चाखायला मिळते. मात्र येथील पावभाजी ही थोडी हटके आहे. कारण त्यात पावभाजीच्या मसाल्याबरोबरच विविध तिखट मसालेही टाकले जातात. त्यामुळे पावभाजीला एक वेगळीच चव प्राप्त होते.
पावभाजीबरोबरच इथे आपल्याला वैशिटय़पूर्ण असे पावभाजी सँडविचसुद्धा मिळते. या पावभाजी सँडविचचे वेगळेपण म्हणजे पावामध्ये भाजीबरोबरच आपल्या नेहमीच्या सँडविचसारखे कांदा, टॉमेटो, काकडी टाकून ते तयार केले जाते. पावभाजी आणि बरोबर तवा पुलाव म्हणजे एकप्रकारचे परिपूर्ण जेवणच. येथे नेहमीच्या तवा पुलावाबरोबरच चीज तवापुलाव, पनीर पुलाव आणि ओ स्पाइसी स्पेशल तवा पुलाव उपलब्ध आहे.
पापड हे दररोजच्या स्टार्टर्समधले एक अग्रगण्य नाव. इथे आपल्याला घरच्यासारखा रोस्टेड किंवा तळलेला पापड तर मिळतोच, परंतु त्याबरोबर एक वेगळा असा ग्रील पापडही मिळतो. चाट आणि फ्रँन्की म्हणजे आजच्या मुलांच्या खाद्याचा केंद्रबिंदू. पाणीपुरी,भेळ पुरी, शेव-पुरीबरोबरच इथे आपल्याला हटके अशी दही भेळ, गोल्डन भेळ, पुऱ्यांचा चुरा आणि चटण्यांपासून तयार केलेल्या पापडी चाटची चवही चाखायला मिळते. फ्रँन्कीमध्ये चीज फ्रँन्की, व्हेज फ्रँन्की, नुडल्स फ्रँन्की, मायोनिज फ्रँन्की अशा विविध प्रकारच्या फ्रँन्की उपलब्ध आहेत.
‘ओ स्पाइसी’चे वैशिष्टय़ म्हणजे येथे मिळणारी ओ स्पाइसी स्पेशल पावभाजी आणि जिनी डोसा. ओ स्पाइसी स्पेशल पावभाजीचे वैशिष्टय़ म्हणजे या पावभाजीमध्ये ड्रायफ्रुट टाकून त्याला शाही रूप दिले जाते. पनीर, सिमला मिरची, टोमॅटो शेजवान चटणीचे मिश्रण डोश्यावरच शिजवून हा आंबट,गोड, तिखट असा आगळावेगळा जीनी डोसा तयार केला जातो.
सध्याची पिढी ही सँडविच आणि पिझ्झाच्या प्रेमातच पडली आहे. कुठलीही पार्टी म्हटली की त्यात पिझ्झा किंवा सँडविच हटकून असतेच. इथे आपल्याला दररोजच्या सँडविचबरोबरच चीज ब्रेड बटर, वैशिटय़पूर्ण असे पायनॅपल सँडविच, रशियन सलाड सँडविच, मुलांचे सर्वात आवडते चॉकलेट सँडविच त्याचबरोबर तिखट चवीचे चिली मिली टोस्ट, कॉर्न पिझ्झा टोस्ट, चीज पनीर टोस्ट असे विविध प्रकारचे सँडविच उपलब्ध आहेत. ग्रील सँडविचमधील मुंबई ग्रील आणि अद्रक, सिमला मिरचीचा खिमा घालून तयार केलेल्या व तिखट चव असलेल्या पहाडी ग्रीलची चव इथे एकदा येऊन नक्की चाखावी. पिझ्झामध्येही चीज पिझ्झा,शेजवान पिझ्झाबरोबरच इथे चटपटा मुंबई पिझ्झा, पहाडी पिझ्झा आणि स्पेशल पायनॅपल पिझ्झाची चव चाखायला मिळते. दाक्षिणात्य पदार्थामध्ये आपल्याकडे डोसा आणि उत्तप्पा मोठय़ा प्रमाणात खाल्ले जातात. सादा डोसा, म्हैसूर डोसा, रवा डोसा, शेजवान मसाला डोसा, नुडल्स डोसा, पालक डोसा, टोमॅटो उत्तपा, स्पेशल नारळ टाकून तयार केलेला कोकोनट उत्तपा. तसेच टोमॅटो, कांदा आणि मसाला टाकून तयार केलेला मिक्स उत्तपा, शेजवान उत्तपा असे आपले दररोजच्या चवीतले डोसे आणि उत्तपे येथे आपल्याला चाखायला मिळतात.
सध्या आपण सगळेच ‘डाएट कॉन्शिअस’ झालो आहोत. त्यामुळे ज्यूस, फ्रुट सलाड, मिल्क शेक हे आपल्या जेवणाचे अविभाज्य भाग बनले आहेत. सध्ये लिक्विड फूड म्हणून ज्यूसला मोठय़ा प्रमाणात पसंती दिली जाते. येथे आपल्याला संत्री, मोसंबी,किवी, कॉकटेल, कलिंगड असे अनेक ज्यूस, व्हॅनिला आइस्क्रीम आणि फ्रुट ज्यूसचे मिश्रण असलेले मँगो ब्लॉसम, ब्लॅक करंट ब्लॉसम, पिना कोलाडा ब्लॉसम अशा अनेक प्रकारच्या ब्लॉसमची चव चाखायला मिळते. मिल्कशेक आणि फालुदामध्ये कोल्ड कॉफी, मिल्कशेक,केसर मिल्कशेक, थंडाई मिल्कशेक, ओरिओ मिल्कशेक, ब्लॅक फॉरेस्ट फालुदा, सीताफळ फालुदा, कुल्फी फालुदा असे अनेक प्रकारचे फालुदेही इथे उपलब्ध आहेत. फ्रुट सलाड विथ जेली, फ्रुट सलाड विथ आइस्क्रीम, जेली विथ आइस्क्रीम आणि त्याचबरोबर ड्रायफ्रुट शेक आवडणाऱ्यांसाठी काजू मिल्कशेक, अंजीर मिल्कशेक, चिकू चॉकलेट विथ नट्स अशा निरनिराळ्या ड्रायफ्रुटस् शेक्सची चव इथे आपल्याला चाखायला मिळते.
ओ- स्पाइसी
- वर्धमान वाटिका, दुकान नं. ४४, डी-मार्टसमोर, कोलशेत रोड,ठाणे ( प.)