भाईंदर :-भाईंदर पश्विम येथे रस्त्यावर बसत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करीता गेलेल्या पथक अधिकाऱ्यावर एका फेरीवाल्याने चक्क लोखंडी रॉड ने हल्ला केल्याची घटना घडली आहे.या हल्ल्यात अधिकाऱ्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून भाईंदर पश्विम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिरा भाईंदर शहरात वाढती अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या अधिक जटील होऊ लागली आहे.त्यामुळे पालिका प्रशासनाकडून कारवाईची कठोर पावले उचलण्यात येत आहे.यात भाईंदर पश्चिम येथील बॉम्बे मार्केट रस्त्यावर  मोठ्या संख्येने फेरीवाले बसत असल्याने रविवारी संध्याकाळी फेरीवाले पथक त्या ठिकाणी दाखल झाले.मात्र प्रशासनाच्या कारवाईमुळे त्या ठिकाणी उपस्थितीत फेरीवाले संतप्त झाले. आणि चक्क एका फेरीवाल्याने कारवाईचा विरोध करत फेरीवाले पथक अधिकारी राकेश त्रिभुवन यांच्या हातावर लोखंडी रॉड ने हल्ला केला. यावेळी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेकरीता सुरक्षा दल कर्मचारी उपस्थितीत होते. त्यामुळे सुरक्षा कर्मचारी आणि फेरीवाल्यांमध्ये बाचाबाची  झाल्याचा विडिओ समाज माध्यमामावर वायरल झाला आहे.या संदर्भात फेरीवाल्यांवर   तक्रारदार पथक अधिकारी राकेश त्रिभुवन यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येत असून त्रिभुवन यांना वैद्यकीय तपासणी करीता पाठवले असल्याची माहिती भाईंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुट पाटील यांनी दिली. काही दिवसापूर्वीच ठाणे शहरात फेरीवाल्यांवर कारवाई करीता गेलेल्या अधिकाऱ्यावर जीवाघेना हल्ला झाल्याची घटना घडली होती.त्यात आता मिरा भाईंदर शहरात देखील फेरीवाल्यांकडून तीव्र विरोध होत असल्याच्या दोन घटना महिना भरात घडल्या आहेत.त्यामुळे यावर ठोस पाऊल उचलेले न गेल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Officer attacked with an iron rod by hawkers in mira bhayandar zws
First published on: 28-11-2021 at 23:28 IST